Preity Zinta Post For Shashank Singh: आयपीएल २०२४ च्या हंगामातील १७ व्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना पंजाब किंग्सच्या शशांक सिंगने अवघ्या २९ चेंडूंमध्ये ६१ धावांची तुफान खेळी करत सर्वांनाच थक्क केले. शशांकच्या सुपर इनिंगमुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टायटन्सच्या १९९ धावांचा पाठलाग करणं पंजाब किंग्ससाठी सोपं झालं. आपल्याला आठवत असल्यास हाच शशांक सिंग हे नाव आयपीएलच्या लिलावाच्या वेळी सुद्धा चर्चेत आले होते. पंजाब किंग्सने दुसराच खेळाडू समजून शशांकला आपल्या संघासाठी खरेदी केल्याची जोरदार चर्चा तेव्हाही रंगली होती. अनेक ऑनलाईन पोस्ट्समधून प्रीती झिंटाला कसा हा व्यवहार तोट्याचा वाटतोय, पश्चाताप होतोय असंही सांगण्यात आलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरंतर पंजाब किंग्स संघाकडून अशाप्रकारची कोणतीही चूक झाल्याचं मान्य करण्यात आलं नव्हतंच पण समजा अशा चर्चा झाल्या असल्या तरी शशांकने आपल्या तुफान खेळीने आता सर्वांचीच तोंडं बंद केली आहेत. पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटा सुद्धा त्याच्या या खेळीमुळे खूप खुश झाली असून तिने या स्टार बॅट्समनचं कौतुक करत एक सुंदर पोस्ट केली आहे.

शशांकच्या जिद्दीचं कौतुक करताना प्रीती झिंटाने लिहिले की, “लिलावाच्या वेळी आलेल्या चुकीच्या चर्चांवर उत्तर देण्यासाठी आजचा दिवस बेस्ट आहे असं मला वाटतं, अशा परिस्थितीत कदाचित कुणाचाही आत्मविश्वास खचून गेला असता, दबावामुळे खेळण्याची इच्छा सुद्धा उरली नसती पण शशांक त्यांच्यापैकी एक नाही. तो खास आहे. फक्त एक खेळाडू म्हणून नव्हे तर त्याच्या सकारात्मक वृत्तीमुळे आणि अविश्वसनीय जिद्दीमुळे तो सगळ्यांपेक्षा वेगळा ठरतो.

“लोकांच्या कमेंट्स, मीम्स, चेष्टा त्याने मस्करीतच घेतल्या, त्याने स्वतःला पाठिंबा दिला आणि तो काय कमाल करू शकतो हे आता त्याने दाखवून दिले आहे. मला त्याचं कौतुक आहेच व त्याहीपेक्षा जास्त त्याचा आदर आहे. जर आयुष्य ठरवल्याप्रमाणे चालत नसेल तरीही ते कधीही वळण घेऊ शकतं यावर विश्वास महत्त्वाचा आहे आणि शशांक त्याचं उदाहरण आहे. महत्त्वाचं इतकंच की, तुम्ही स्वतःबद्दल चांगला विचार करायला हवा, शशांकप्रमाणे तुम्हीही स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवू नका मला खात्री आहे तुम्ही सगळेच यामुळे सामनावीर होऊ शकता.”

माहितीसाठी सांगायचं तर, पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात, शशांक सिंगने २०० धावांचा पाठलाग करताना डावाच्या नवव्या षटकात ७०-४ धावा झाल्यावर २९ चेंडूत कारकिर्दीतील सर्वोत्तम ६१ धावांची नाबाद इनिंग खेळली होती त्याआधी त्याने सिकंदर रझा, जितेश शर्मा आणि आशुतोष शर्मा यांच्यासह महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मॅचच्या शेवटच्या चेंडूवर खेळ संपवून शशांक पंजाबच्या विजयाचा चेहरा ठरला होता.

हे ही वाचा<< Video: शेवटचा पर्याय ‘तोच’! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या सलग तीन पराभवानंतर पोहोचला गुजरातला अन्..

शशांक सिंग आता हैदराबाद विरुद्ध IPL 2024 हंगामातील २३ व्या सामन्यात पंजाब किंग्जला असाच विजय मिळवून देऊ शकणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. बहुप्रतिक्षित असा हा सामना ९ एप्रिल रोजी मुल्लानपूर येथे रंगणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl gt vs pbks shashank singh batting highlights preity zinta post over controversy during ipl auction shows love ipl point table updates svs
Show comments