गौतम गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर नवनिर्वाचित कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर खेळणा-या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने कोलकाता नाइट रायडर्सला ५५ धावांनी नमवून पराभवाची मालिका संपवली. दिल्लीकडून खेळणारे मुंबईकर खेळाडू श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने २२० धावांचं तगडं आव्हान कोलकात्यासमोर ठेवलं होतं. पण या आव्हानाचा सामना करताना कोलकात्याचा संघ २० षटकात ९ गडीबाद केवळ १६४ धावाच बनवू शकला. कोलकात्याकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक ३० चेंडूत ४४ धावा केल्या. त्या खालोखाल शुभमन गिलने २९ चेंडूत ३७ धावा काढल्या , पण जम बसत आहे असं वाटत असतानाच शुभमन धावबाद झाला.  दिल्लीकडून अमित मिश्रा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तत्पूर्वी, दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद स्वीकारल्यावर पहिल्याच सामन्यात श्रेयसची बॅट चांगलीच तळपली. या सामन्यात त्याने फक्त 40 चेंडूंत 3 चौकार आणि दहा षटकारांच्या जोरावर नाबाद 93 धावांची तुफानी खेळी साकारली. कोलकाताने टॉस जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. पृथ्वी शॉ आणि कॉलिन मुनरोने सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर तुटून पडत फटकेबाजी सुरु केली. १८ चेंडूत ३३ धावा ठोकणाऱ्या मन्रोला शिवम मावीने बाद केलं आणि ही जोडी फोडली. मुनरो आऊट झाल्यानंतर श्रेयस आणि पृथ्वीने फटकेबाजी सुरु ठेवली. दोघांनी ६८ धावांची भागीदारी केली. पृथ्वीने दमदार सलामी देताना 44 चेंडूंत 7 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 62 धावा केल्या. पियुष चावलाने पृथ्वीला बाद करत धावसंख्येला लगाम घालण्याचे प्रयत्न केले. पृथ्वी हा आयपीएलच्या इतिहासातील अर्धशतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. या दोघांच्या तडफदार फलंदाजीमुळे दिल्लीने कोलकात्यापुढे 220 धावांचे आव्हान ठेवले होते. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत सातवे स्थान पटकावले आहे.

संक्षिप्त धावफलक दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ४ बाद २१९ (श्रेयस अय्यर नाबाद ९३, पृथ्वी शॉ ६२; आंद्रे रसेल १/२८) विजयी वि. कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ९ बाद १६४ (आंद्रे रसेल ४४, शुभमन गिल ३७; ग्लेन मॅक्सवेल २/२२)

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata need 220 run to win against delhi
First published on: 27-04-2018 at 19:41 IST