या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन प्रीमियर लीगच्या १३व्या हंगामाचा झोकात प्रारंभ केल्यानंतर पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी उत्सुक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला अंबाती रायुडूचे बहुप्रतीक्षित पुनरागमन तारेल अशी अपेक्षा आहे. परदेशी चौकडीच्या बळावर विजयाचे समीकरण साधणाऱ्या सनरायजर्स हैदराबादशी शुक्र वारी त्यांचा सामना होणार आहे.

रायुडू चेन्नईच्या ‘आयपीएल’मधील पहिल्या विजयाचा शिल्पकार होता. परंतु मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे त्याला दोन सामन्यांना मुकावे लागले. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये दुखापत झाल्यामुळे ड्वेन ब्राव्हो अखेरच्या दोन सामन्यांत गोलंदाजी करू शकला नव्हता. परंतु ‘आयपीएल’मध्येही तो अद्याप खेळू शकलेला नाही. पण हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रायुडू आणि ब्राव्हो दोघेही खेळणार आहेत.

रायुडू परतल्यास तो शेन वॉटसनसह सलामीला उतरेल, तर धावांसाठी झगडणाऱ्या मुरली विजयला विश्रांती देण्यात येईल. परंतु ब्राव्होला स्थान देताना कर्णधार महेंद्रसिंह धोनीला अपेक्षेनुसार कामगिरी करू न शकणाऱ्या केदार जाधवच्या जागेचा विचार करता येऊ शकतो. ब्राव्हो नसताना चेन्नईकडून सॅम करनने पहिल्या तीन सामन्यांत लक्षवेधी कामगिरी केली आहे. वेगवान मारा आणि दिमाखदार फटके बाजी ही वैशिष्टय़े जोपासणाऱ्या करनची संघाला आवश्यकता आहे. .

‘आयपीएल’मध्ये चेन्नई आणि हैदराबादचे संघ हे सर्वात समतोल संघ म्हणून ओळखले जातात. परंतु दोन्ही संघांना यंदा विजयाचे सातत्य राखण्यात अपयश आले आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंतच्या तीन सामन्यांपैकी दोन सामने गमावले आहेत. दोन्ही संघांना मधल्या फळीची चिंता भेडसावते आहे.

केन विल्यम्सनमुळे हैदराबादची मधली फळी सुधारली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरसुद्धा हे दोघेही लयीत फलंदाजी करीत आहेत. मात्र हे तीन अव्वल परदेशी फलंदाज अपयशी ठरल्यास डाव सावरू शकणाऱ्या मधल्या फळीतील भारतीय फलंदाजाची त्यांना नितांत गरज आहे. काश्मीरच्या अब्दुल समादसह प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा यांच्याकडून हैदराबादला मोठय़ा अपेक्षा आहेत.

*  सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि एचडी वाहिन्या

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 chennai will face sunrisers hyderabad today abn
First published on: 02-10-2020 at 00:23 IST