सनरायझर्स हैदराबाद संघाला मोक्याच्या सामन्यात पराभूत करत दिल्लीने पहिल्यांदाच IPLच्या अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन याने ५० चेंडूत ७८ धावा करत संघाला १८९ धावांपर्यंत मजल मारून दिली. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना केन विल्यमसनने संघर्षपूर्ण अर्धशतक ठोकलं, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन याने नावाप्रमाणेच ‘गब्बर’ खेळी करत ५० चेंडूत ७८ धावा कुटल्या. धवनच्या खेळीत ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या खेळीसह त्याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला मागे टाकलं. धवनने ७८ धावांची खेळी करत IPL कारकीर्दीत ५,१८२ धावा केल्या. रोहितच्या नावावर सध्या ५,१६२ IPL धावा आहेत. या पराक्रमासह धवन IPL कारकिर्दीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला. या यादीत विराट कोहली पहिला, सुरेश रैना दुसरा तर डेव्हिड वॉर्नर तिसरा आहे.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवनच्या खेळीच्या जोरावरच दिल्लीने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला तर शिमरॉन हेटमायरने २२ चेंडूत ४२ धावा करत संघाला १८९ धावांपर्यंत मजल मारून दिली. १९० धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचे महत्त्वाचे ४ फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर केन विल्यमसनने झुंज देत अर्धशतक ठोकलं पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले.