आयपीएलच्या तेराव्या हंगामात दुबईच्या मैदानावर सनराईजर्स हैदराबाद संघाला २०१ धावांवर रोखण्यात पंजाबचे गोलंदाज यशस्वी ठरले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी १६० धावांची भागीदारी केल्यानंतर हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असतानाच पंजाबच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत चांगलं पुनरागमन केलं आणि हैदराबादला २०१ धावांवर रोखलं. २०२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबच्या संघाची सुरुवात खराब झाली.

मयांक अग्रवाल, लोकेश राहुल आणि प्रबसिमरन सिंह हे सलामीचे फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतले. मात्र यानंतर वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनने संघाचा डाव सावरत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. आयपीएलमध्ये आपलं पहिलं अर्धशतक झळकावणाऱ्या पूरनने १७ चेंडूत अर्धशतक झळकावलं. ही कामगिरी करताना पूरनने आपला कर्णधार लोकेश राहुल आणि डेव्हिड मिलरचा विक्रम मोडला.

पंजाबकडून पहिल्या डावात फिरकीपटू रवी बिश्नोईने चांगली कामगिरी केली. एकाच षटकात डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या फलंदाजांना माघारी धाडत त्याने पंजाबला सामन्यात पुनरागमन करुन दिलं. यानंतर अर्शदीप सिंहनेही मोक्याच्या क्षणी दोन बळी घेत हैदराबादच्या धावगतीवर अंकुश लावला. पंजाबचे फलंदाज झटपट बाद होत असताना पूरनने एका बाजूने किल्ला लढवला. ३७ चेंडूत ७७ धावांची खेळी करुन राशिद खानच्या गोलंदाजीवर तो माघारी परतला. आपल्या अर्धशतकी खेळीत पूरनने ५ चौकार आणि ७ षटकार लगावले.