प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपल्या धडाकेबाज कामगिरीचं सत्र कायम ठेवत शनिवारी दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभवाचा धक्का दिला. ९ गडी राखत सामना जिंकत मुंबईने आपलं पहिलं स्थान अधिक भक्कम केलं आहे. दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागेवर वेस्ट इंडिजचा अनुभवी खेळाडू कायरन पोलार्ड मुंबईचं नेतृत्व करत आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये पोलार्डने रोहितची उणीव संघाला भासू दिली नाही. परंतु मुंबईसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे रोहित शर्मा लवकरच संघात पुनरागमन करु शकतो. कायरन पोलार्डने याबद्दलची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“रोहितची दुखापत आता बरी होत आहे आणि आम्हाला आशा आहे की तो लवकरच संघात पुनरागमन करेल.” सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पोलार्डने माहिती दिली. ३ तारखेला मुंबई इंडियन्स आपला अखेरचा साखळी सामना हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात रोहित संघात पुनरागमन करण्याची शक्यता होती. परंतू मुंबईने प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क केल्यामुळे या सामन्याला संघाच्या दृष्टीने फारसा अर्थ उरत नाही. त्यामुळे हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही रोहितला विश्रांती देऊन तो प्ले-ऑफमध्ये खेळण्याची शक्यता आहे. त्याला जेवढा जास्त आराम मिळेल तेवढा तो लवकर बरा होईल, अशी माहिती रोहितच्या जवळील सूत्रांनी पीटीआयला दिली.

दरम्यान, १११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या डावाची धडाकेबाज सुरुवात केली. किशन आणि डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. सलामीची जोडी मुंबईला विजय मिळवून देणार असं वाटत असताना डी-कॉक बाद झाला. परंतू यानंतर इशानने सूर्यकुमारच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत इशान किशनने नाबाद ७२ धावांची खेळी केली. आपल्या अर्धशतकी खेळीत किशनने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 rohit sharma will be back soon assures kieron pollard psd
First published on: 31-10-2020 at 21:22 IST