आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफची शर्यत अधिक रंगतदार झालेली आहे. गुरुवारी चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली. चेन्नईच्या या विजयामुळे मुंबईचा संघ १६ गुणांनिशी प्ले-ऑफला दाखल झाला आहे. दिनेश कार्तिकने कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर ओएन मॉर्गनकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. मात्र हा बदल संघासाठी फायदेशीर ठरलेला दिसत नाही. चौथ्या स्थानाची शर्यत अधिक चुरशीची होत असताना KKR ला आता आपल्या उर्वरित सामन्यांत विजय मिळवून इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीरने स्पर्धेच्या मध्यावधीत कर्णधारपद सोडणाऱ्या दिशेन कार्तिकवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करायचं म्हणून कार्तिकने कर्णधारपद सोडलं, पण त्याचा फार काही परिणाम झालाय असं वाटत नाही. तुम्ही किती गोंधळलेल्या मनस्थितीत आहात हे यातून स्पष्ट होतं. कधीकधी तुम्ही स्वतःहून काही जबाबदाऱ्या अंगावर घेणं चांगलं असतं. २०१४ साली मी खराब काळातून जात होतो. त्यावेळी मी स्पर्धेत सलग ३ सामन्यांत शून्यावर बाद झालो. यादरम्यान एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे, या कर्णधारपदाच्या जोरावरच मी माझा हरवलेला फॉर्म पुन्हा मिळवू शकतो. ज्यावेळी मी फलंदाजीत चांगली कामगिरी करत नव्हतो, त्यावेळी माझ्या कर्णधारपदातून योग्य निर्णय घेऊन संघाला कसा फायदा होईल हा विचार माझ्या मनात असायचा. पण ज्यावेळी तुमच्या हातात कर्णधारपद नसतं त्यावेळी साहजिकच तुमच्याकडे निर्णय घेण्याचे हक्क नसतात..तुम्ही फक्त फलंदाजीबद्दलच विचार करु शकता.” एका खासगी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत गंभीरने आपलं मत मांडलं.

एक-दोन सामन्यांचा अपवाद वगळता दिनेश कार्तिक तेराव्या हंगामात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. चेन्नईविरुद्ध सामन्यातही दिनेशने अखेरच्या षटकांत फटकेबीज करुन संघाला १७२ धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र ऋतुराज आणि जाडेजाच्या फटकेबाजीने चेन्नईने सामन्यात बाजी मारली. या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचा अखेरचा साखळी सामना रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून पंजाबच्या संघाने आपले दोन्ही सामने गमावल्यास आणि हैदराबादच्या संघाने किमान एक सामना गमावल्यास KKR ला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळू शकतं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It just shows the mindset ex kkr skipper gautam gambhir slams dinesh karthik for leaving captaincy midway psd
First published on: 30-10-2020 at 15:06 IST