डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाने गेल्या काही सामन्यांत धडाकेबाज कामगिरी करत गुणतालिकेतील सर्व अव्वल संघांना धक्का दिला. पहिल्या एलिमिनेटर सामन्यातही हैदराबादने RCB वर मात करत अंतिम फेरीच्या दिशेने एक पाऊल टाकलं. रविवारी हैदराबादचा सामना दिल्लीसोबत होणार आहे. या सामन्यात बाजी मारल्यास हैदराबादचा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. सनराईजर्स हैदराबादचा महत्वाचा गोलंदाज टी.नटराजन सध्या चांगल्याच आनंदात आहे. RCB विरुद्ध सामन्यादरम्यान नटराजनच्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने याबद्दल माहिती दिली. टी. नटराजन हा यंदाच्या हंगामात हैदराबादला मिळालेला हुकुमी एक्का ठरला आहे. RCB विरुद्ध सामन्यातही नटराजनने यॉर्कर चेंडूवर एबी डिव्हीलियर्सची घेतलेली विकेट हा चर्चेचा विषय ठरली होती. एकाच षटकात डिव्हीलियर्स आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन फलंदाजांना बाद करत नटराजनने आपल्या मुलाला गिफ्ट दिलं आहे. दिल्लीविरुद्ध सामन्यातही हैदराबादच्या संघाला नटराजनकडून अशाच धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा असणार आहे.