इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) प्रामुख्याने भारतातील खेळाडू आणि प्रशिक्षकांना संधी देण्याचे कार्य करते. त्यामुळे आगामी हंगामांमध्ये ‘आयपीएल’च्या संघांनी मुख्य प्रशिक्षकपदासाठी भारतीय प्रशिक्षकांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केली.

१९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती येथे सुरू होणाऱ्या ‘आयपीएल’च्या १३व्या हंगामात सहभागी झालेल्या आठपैकी सात संघांचे मुख्य प्रशिक्षक हे विदेशी आहेत. फक्त माजी फिरकीपटू कुंबळे हे एकमेव भारतीय प्रशिक्षक पंजाबला मार्गदर्शन करताना दिसतील. महेला जयवर्धने (मुंबई इंडियन्स), स्टीफन फ्लेमिंग (चेन्नई सुपर किंग्ज), रिकी पाँटिंग (दिल्ली कॅपिटल्स), ब्रँडन मॅक्क्युलम (कोलकाता नाइट रायडर्स), ट्रेव्हर बेलिस (सनरायजर्स हैदरबाद), सायमन कॅटिच (रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु), अँड्रय़ू मॅक्डोनाल्ड (राजस्थान रॉयल्स) हे सात विदेशी प्रशिक्षक ‘आयपीएल’मध्ये मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसतील.

‘‘भारताचे आणखी मुख्य प्रशिक्षक ‘आयपीएल’मध्ये दिसले, तर मला खरच आनंद होईल. भारतामध्ये गुणवान प्रशिक्षकांची खाण आहे, परंतु ‘आयपीएल’मधील सध्याचे चित्र पाहता भारतीय मुख्य प्रशिक्षकांचा अभाव आढळतो. त्यामुळे आगामी हंगामांत भारताच्या प्रशिक्षकांना मुख्य प्रशिक्षकपदासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा आहे,’’ असे ४९ वर्षीय कुंबळे म्हणाले.

पंजाबने अद्याप एकदाही ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवले नसले तरी यंदा के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली त्यांना विजेतेपदाचा चषक उंचावण्याची उत्तम संधी आहे, असे कुंबळे यांना वाटते. २०१४च्या अमिरातीतील ‘आयपीएल’मध्ये पंजाबने उपविजेतेपद मिळवले होते.

‘‘अमिरातीतीतल खेळपट्टय़ांना साजेसे खेळाडू पंजाबच्या ताफ्यात आहेत. राहुल हा एक प्रतिभावान खेळाडू असून तो कर्णधार म्हणूनही नक्कीच छाप पाडेल,’’ असे कुंबळे यांनी सांगितले.