सूर्यकुमार यादवच्या झंझावाती शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने ७ विकेट्सने हैदराबादवर विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने या विजयासह हैदराबादकडून मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर १०२ धावांची तुफान खेळी केली. एकटा सूर्याचं हैदराबादच्या संघावर भारी पडला आणि पराभवासह हैदराबादला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी अधिक खडतर प्रवासाचा सामना करावा लागणार आहे. सूर्याला तिलक वर्माने चांगली साथ देत ३२ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. हैदराबादने दिलेल्या १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्याने ६ धावांची गरज असताना विजयी षटकारासह लक्ष्य पूर्ण केले. मुंबईने १७.२ षटकांत हे लक्ष्य सहज गाठले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईने चांगली सुरूवात केली. इशान किशनने पहिल्या २ चेंडूवर शानदार चौकार लगावले, तर रोहितने पहिल्याच षटकात एक चौकार लगावला. तर दुसऱ्या षटकात इशान किशनने चांगले शॉट्स खेळले पण तो यान्सनच्या गोलंदाजीवर बाद ९ धावा करत बाद झाला. यानंतर कमिन्स आणि भुवनेश्वरचे षटक मुंबईला धक्के देणारे ठरले. रोहित शर्मा ४ धावा करत कमिन्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तर नमन धीरला ९ चेंडूत एकही धाव करता आली नाही आणि तो खातेही न उघडता बाद झाला. या सलग दोन धक्क्यांनंतर पुन्हा मुंबई इंडियन्स गडबडणार असे वाटले पण सूर्यकुमारने संघाचा डाव उचलून धरला.

सूर्यकुमार यादव सुरूवातीच्या काही चेंडूवर बाद होता होता वाचला पण तो मैदानात टिकून राहिला. त्यानंतर आलेल्या तिलक वर्माने त्याला शेवटपर्यंत चांगली साथ दिली. सूर्या चांगली फटकेबाजी करत होता तर संधी मिळताच तिलकनेही आपले फटके दाखवून दिले. कमिन्सच्या भेदक गोलंदाजीला सडेतोड उत्तर देत तिलकने एक शानदार चौकार लगावला आणि त्यानंतर दोघांनी फटकेबाजी सुरू केली मग संघाला विजय मिळवूनच हे दोघे परतले. तिलकने ३२ चेंडूत ६ चौकारांसह ३७ धावा केल्या.

तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादची फलंदाजी बाजू आज शांत होती. मुंबईच्या गोलंदाजांनी आपली उत्कृष्ट गोलंदाजी दाखवत हैदराबादच्या धावांना ब्रेक लावला. हैदराबादने हेडच्या ४८ धावा आणि कमिन्सच्या ३५ धावांच्या खेळीसह १७३ धावा केल्या. हेडला सामन्यात दोनदा जीवदान मिळाले पण तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. बुमराहच्या गोलंदाजीसमोर अभिषेक शर्मा ११ धावा करत बाद झाला. तर हैदराबादचे इतर फलंदाजही २० धावांचा आकडा न गाठताच माघारी गेले. पॅट कमिन्सने अखेरच्या षटकांमध्ये ३५ धावा करत संघाची धावसंख्या १७३ वर नेली. मुंबईकडून हार्दिक पंड्या आणि पियुष चावलाने सर्वाधिक ३-३ विकेट्स घेतल्या तर बुमराह आणि पदार्पणवीर अंशुल कंबोजने प्रत्येकी १ विकेट मिळवली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mi beat srh by 7 wickets with suryakumar yadav superb century and bowling unit ipl 2024 bdg
First published on: 06-05-2024 at 23:19 IST