आयपीएल २०२५च्या क्वालिफायर सामन्यात आऱसीबीने पंजाब किंग्सला ऑल आऊट करत मोठा धक्का दिला आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पंजाब किंग्सच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिलं नाही. मजबूत फलंदाजी क्रम असलेल्या पंजाब किंग्सच्या फलंदाजांना आरसीबीच्या गोलंदाजांनी तोंडावर पाडलं आणि संघाला फक्त १४.१ षटकांत ऑल आऊट करत माघारी धाडलं. पंजाब किंग्सने यासह आयपीएल प्लेऑफमधील दुसरी सर्वात छोटी धावसंख्या केली आहे.
पंजाब किंग्सचे फलंदाज १४.१ षटकांत फक्त १०१ धावा करू शकले आणि सर्वबाद झाले. आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजीला सुरूंग लावला आणि एकही फलंदाज ३० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. फक्त मार्कस स्टॉयनिस २६ धावा करत माघारी परतला, जी पंजाबच्या डावातील सर्वात मोठी धावसंख्या होती.
संघाचे सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग स्वस्तात बाद झाले. प्रियांश आर्य यश दयालच्या गोलंदाजीवर दुसऱ्याच षटकात ७ धावा करत बाद झाला. यानंतर विकेट्सचा सिलसिला सुरू झाला आणि अखेरीस पंजाब किंग्सला ऑल आऊट करतच थांबला. प्रियांशनंतर काही फटके खेळल्यानंतर प्रभसिमरन सिंग १० चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १८ धावा करत बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर ४ धावा आणि जोश इंग्लिस २ धावा तर नेहाल वढेरा ८ धावा करत लागोपाठ झेलबाद झाले. पंजाबने ४ षटकांत ४ झटपट विकेट पॉवरप्लेमध्ये गमावले.
आरसीबीकडून भुवनेश्वर आणि रोमारियो शेफर्डने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. तर हेझलवूड आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. सुयश शर्माने तर एकाच षटकात २ विकेट घेतल्या आहेत. तर यश दयालने २ विकेट्सही घेतल्या. यादरम्यान आरसीबीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षणही केलं. मैदानावरील संघाची एनर्जी आणि कामगिरी उत्कृष्ट होती. तर पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याच्या नादात झटपट विकेट्स गमावले.