रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अष्टपैलू कामगिरी करत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. प्लेऑफमध्ये धडक मारणारा आरसीबी चौथा संघ ठरला आहे. यश दयाल आरसीबीसाठी तारणहार ठरला. त्याच्या २०व्या षटकातील उत्कृष्ट गोलंदाजीने संघाला विजय मिळवून दिला. बलाढ्य चेन्नईचा २७ धावांनी पराभव करत आऱसीबीने मोठा विजय मिळवला आहे. सुरूवातीच्या सामन्यांमध्ये पराभवांची रांग लावल्याने संघाच्या कामगिरीवर टिका झाली. पण त्यानंतर आऱसीबीने संघ संयोजनात बदल करत एकापेक्षा एक विजय मिळवले आणि प्लेऑफसाठी आपला दावा ठोकला. फक्त दावाच नाही तर सर्व संघांना मागे टाकत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे.

फाफ डू प्लेसिसच्या संघाचा हा सलग सहावा विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ५ गड्यांच्या मोबदल्यात २१८ धावा केल्या. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला २०० किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येवर रोखावे लागले. सर्व प्रयत्नांनंतरही चेन्नईचा संघ ७ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावाच करू शकला.

यश दयालचे २० वे षटक ठरले निर्णायक


यश दयालला सामन्यातील २०वे आणि महत्त्वाचे षटक टाकण्याची संधी दिली. त्या सामन्यात चेन्नईला विजयासाठी ६ चेंडूत १७ धावांची गरज होती. यशच्या पहिल्या चेंडूवर धोनीने मोठा षटकार लगावला आणि सर्वांनाच रिंकूचे षटकार आठवले. पण यश दयालने पुढच्याच चेंडूवर धोनीला थेट झेलबाद केलं आणि आऱसीबीला सामन्यात परत आणले. त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर ३ चेंडूत ११ धावा हव्या होत्या. चौथ्या चेंडूवर ठाकूरने १ धाव घेत जडेजाला स्ट्राईक दिली. यानंतर २ चेंडूत १० धावांची गरज होती. यानंतर पाचवा चेंडूही डॉट बॉल आणि इथेच आऱसीबीने सेलिब्रेट करायला सुरूवात केली. तर सहावा चेंडूही डॉट बॉल राहिला आणि आऱसीबीने विजय मिळवला. . विराट कोहलीच्या डोळ्यात तर आनंदाश्रू तरळताना दिसले.

चेन्नईची सुरुवात खूपच खराब झाली आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड डावाच्या पहिल्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलचा बळी ठरला. डॅरिल मिशेललाही केवळ ४ धावा करता आल्या. १९ धावांवर दोन विकेट पडल्यानंतर रचिन रवींद्र आणि अजिंक्य रहाणे यांनी डावाची धुरा सांभाळली. दोघांनीही चांगले फटके खेळले आणि तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. २२चेंडूत ३३ धावा करून रहाणे फर्ग्युसनचा बळी ठरला. यानंतर शिवम दुबे फार काही करू शकला नाही आणि स्वस्तात बाद झाला. दरम्यान, रचिन रवींद्रने आपले अर्धशतक पूर्ण केले. रचिन चांगल्या फॉर्मात दिसत होता, पण दुबेसोबतच्या खराब समन्वयामुळे त्याला धावबाद व्हावे लागले. दुबे स्वतःही पुढच्या षटकात बाद झाला. ग्रीनचा बळी ठरलेल्या शिवम दुबेने १५ चेंडूत ७ धावा केल्या.

फॅफने अप्रतिम झेल घेत सँटनरला माघारी पाठवले. तो बाद झाला तेव्हा चेन्नईची धावसंख्या १५ षटकांत ६ बाद १२९ धावा होती. येथून रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनीने डाव पुढे नेला. चेन्नईला शेवटच्या षटकात १७ धावांची गरज होती. यश दयालच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने षटकार ठोकला. पण दुसऱ्याच चेंडूवर तो बाद झाला. दयालने पुढच्या चार चेंडूंवर केवळ एक धाव दिली आणि आपल्या संघाला प्लेऑफमध्ये नेले.

कर्णधार फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या फळीतील चमकदार कामगिरीमुळे आरसीबीला मजबूत धावसंख्या गाठण्यात यश आले. डुप्लेसिसने ५४ धावांच्या खेळीत ३९ चेंडूंचा सामना केला आणि तीन चौकारांसह तीन षटकारही ठोकले. त्यांच्याशिवाय विराट कोहलीने २९ चेंडूत ४७ धावा केल्या तर रजत पाटीदारने २३ चेंडूत ४१ धावा केल्या. कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल यांनीही २०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या.