Rinku Singh hilariously fails at vlogging after IPL final win vs SRH : आयपीएल २०२४ च्या १७ व्या मोसमातील अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विजेता ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने महाअंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर ८ विकेट्सने विजय मिळवला आहे. यामुळे केकेआरने विजयासह २०२४ च्या आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना रंगला, यावेळी विजयानंतर केकेआरचे खेळाडू आनंदाने मैदानातच नाचताना दिसले. अशातच रिंकू सिंगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो क्रिकेटर नाही तर एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. रिंकू सिंग विजयानंतर मैदानातच चक्क व्लॉगिंग करताना दिसला.

IPL 2024 ची फायनल जिंकल्यानंतर केकेआरचे सर्वच खेळाडू जल्लोष करत होते. एकमेकांची गळाभेट घेत खेळाडूंनी आपला आनंद व्यक्त केला. मात्र, दुसरीकडे रिंकू सिंग व्लॉग बनवण्यात व्यस्त होता. रिंकू सिंग आपल्याला आत्तापर्यंत अनेक भन्नाट गोष्टी करताना पाहायला मिळाला. आता त्याची व्लॉगरची भूमिकाही अनेकांना आवडली आहे.

“यापेक्षा CSK vs RCB चा सामना रोमांचक होता’ KKR vs SRH सामन्यानंतर युजर्सचा संताप; एक्सवर “Worst IPL” ट्रेंड

रिंकूच्या व्लॉगिंग व्हिडीओमध्ये त्याच्याबरोबर नितीश राणा, नितीशची पत्नी साची मारवाह आणि अनुकूल रॉय दिसत आहेत. व्हिडीओ सुरू होताच रिंकू सिंग म्हणतो की, ‘हॅलो मित्रांनो, नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे.’ यानंतर साची आणि नितीश प्रेक्षकांना रिंकूला सबस्क्राईब करण्यास सांगतात. तेव्हा रिंकू ‘सबस्क्राईब करा आणि बेल बटण दाबा’ असे म्हणतो. अगदी हसत खेळत त्यांनी या व्लॉगची सुरुवात केली होती. यात सामना संपल्यानंतरचा मैदानावरील माहोल त्याने रेकॉर्ड केला. दरम्यान, रिंकूचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अनेकांनी कमेंट्समध्ये हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. त्यामुळे रिंकूचा हा अंदाज चाहत्यांनाही फार आवडला आहे. एका युजरने कमेंट केली की, चहलने याला बिघडवले आहे, तर दुसऱ्या एकाने लिहिले की, भावा मला पण लाईफमध्ये असं चिल करायचं आहे, तिसऱ्या एकाने लिहिले की, लाईव्ह परफॉर्मन्स देतोयस का?

कोलकाता तिसऱ्यांदा ठरला आयपीएलचा विजेता

यापूर्वी कोलकाताने आयपीएल २०१२ आणि आयपीएल २०१४ मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर दहा वर्षांनी त्यांनी आयपीएल २०२४ मध्ये हे विजेतेपद पटकावले. यातील विशेष गोष्ट म्हणजे गौतम गंभीरचा तिन्ही आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात मोठा वाटा आहे. गौतम गंभीर आयपीएल २०१२ आणि आयपीएल २०१४ मध्ये कोलकाता संघाचा कर्णधार होता आणि आता तो आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा मार्गदर्शक आहे.

KKR vs SRH मॅच समरी

सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. पहिल्या डावात कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली, त्यामुळे हैदराबादच्या एकाही खेळाडूला ३० धावांपर्यंत मजल मारता आली नाही. हैदराबादचा संपूर्ण संघ १८.३ षटकांमध्ये ऑलआउट झाला आणि केवळ ११३ धावाच करू शकला.

प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने शानदार फलंदाजी केली. त्यांनी १०.३ षटकांमध्येच ११४ धावा करत सामना जिंकला आणि आयपीएल २०२४ ची ट्रॉफी जिंकली.