Travis Head scored a century in 39 balls : आयपीएल २०२४ मधील ३० वा सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघासाठी सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या ट्रेव्हिस हेडने ३९ चेंडूत शतक झळकावले. हे आयपीएलमधील चौथे सर्वात वेगवान शतक आहे. आता तो कोहली, बटलर आणि रोहितनंतर यंदाच्या हंगामात शतक झळकावणारा चौथा खेळाडू ठरला आहे.

ट्रॅव्हिस हेडने हैदराबादसाठी झळकावले सर्वात वेगवान शतक –

ट्रॅव्हिसने आरसीबीविरुद्ध ४१ चेंडूत १०२ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याच्या बॅटमधून ९ चौकार आणि ८ षटकार आले. विशेष म्हणजे हेडचे हे शतक हैदराबादकडून सर्वात वेगवान शतक आहे. याआधी डेव्हिड वॉर्नरने हैदराबादकडून खेळताना ४३ चेंडूत शतक झळकावले होते. याशिवाय हैदराबादसाठी हेनरिक क्लासेनने ४९ चेंडूत शतक झळकावले आहे. आता हेडने अवघ्या ३९ चेंडूत शतक झळकावून सर्वांना मागे टाकले आहे. त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे संघाची धावसंख्या सहज २०० च्या पुढे गेली.

ट्रॅव्हिस हेडची आयपीएलमध्ये एंट्री २०१६ मध्ये झाली होती आणि तो २०१७ मध्ये आरसीबीकडून या लीगमध्ये खेळला होता. परंतु त्यानंतर कोणत्याही संघाने त्याला या लीगमध्ये आपल्या संघाचा भाग बनवले नाही. मात्र, २०२४ च्या लिलावात हैदराबादने त्याची निवड केली. त्यांच्या संघासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आणि ८ वर्षांनंतर तो पुन्हा या लीगमध्ये परतला.

हेही वाचा – IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?

आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने २० चेंडूत चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले आणि आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान त्याने ५ षटकार आणि ३ चौकार लगावले. त्याने पॉवरप्लेमध्ये म्हणजेच ६ षटकांत अर्धशतक पूर्ण केले. यानंतर त्याने वेगवान फलंदाजी करत ३९ चेंडूत चौकार मारून आपले पहिले शतक पूर्ण केले. आपल्या शतकी खेळीत त्याने ८ षटकार आणि ९ चौकार लगावले. हेडने ३९ चेंडूत शतक झळकावून एबी डिव्हिलियर्स आणि गिलख्रिस्टचा विक्रम मोडला आणि या लीगमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर पोहोचला.

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारे फलंदाज-

३० – ख्रिस गेल
३७- युसूफ पठाण
३८ – डेव्हिड मिलर
३९ – ट्रॅव्हिस हेड
४२ – ॲडम गिलख्रिस्ट
४२- एबी डिव्हिलियर्स
४५ – सनथ जयसूर्या