देशाचा नागरिक म्हणून सुप्रीम कोर्टाचा निर्णय मला पूर्णपणे मान्य आहे. कोर्टाच्या निर्णयाचा मी आदर करतो. बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून मी आजवर कोणतीही वैयक्तिक लढाई केलेली नाही. संघटनेच्या स्वायत्ततेसाठी मी लढा देत आलो, अशी प्रतिक्रिया अनुराग ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दिली. सुप्रीम कोर्टाने सोमवारी झालेल्या सुनावणीत अनुराग ठाकूर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवले. कोर्टाच्या निर्णयानंतर अनुराग ठाकूर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून कोर्टाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया नोंदवली.
बीसीसीआय देशातील सर्वोत्तम क्रीडा संघटना असून जगाशी तुलना करता भारतात क्रिकेटच्या खूप चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. बीसीसीआयच्या मदतीने स्थानिक क्रीडा संघटना खूप चांगले काम करत आहेत. माझ्यासाठी ही वैयक्तिक लढाई नव्हती, मी आजवर संघटनेच्या स्वायत्ततेसाठी लढा दिला. पण मी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो, असे अनुराग ठाकूर म्हणाले.

वाचा: क्रिकेटचा विजय झाला, आता अन्य खेळांचाही होऊ दे- न्यायमूर्ती लोढा

 

कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतानाच ठाकूर यांनी आपली नाराजी देखील व्यक्त केली. ते म्हणाले की, निवृत्त न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली बीसीसीआयचा कारभार यापेक्षाही अधिक चांगला होऊ शकतो असे तर सुप्रीम कोर्टाला वाटत असेल तर त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. भारतीय क्रिकेट त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे. भारतीय क्रिकेट खेळाप्रतीची माझी बांधिलकी यापुढेही कायम राहिल, असेही अनुराग ठाकूर म्हणाले.

वाचा: सुप्रीम कोर्टाकडून अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांची ‘विकेट’, पदावरून हटवले

लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्याने सुप्रीम कोर्टाने आज बीसीसीआयला धक्का दिला. अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची पदावरून हकालपट्टी केली. शिवाय, नव्या पदाधिकाऱयांच्या नेमणुकीसाठी कायदेतज्ज्ञ फली नरिमन आणि गोपाल सुब्रमण्यम यांची नियुक्ती केली आहे. याप्रकरणी येत्या १९ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.