असाफा पॉवेल आणि शेरोन सिम्पसन हे राहत असलेल्या हॉटेलवर इटली पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यातून पोलिसांनी काही वस्तू जप्त केल्या आहेत. प्रतिबंधित उत्तेजकांच्या सेवनाप्रकरणी हे दोघेही दोषी आढळले होते. असाफा आणि शेरोन यांच्या तसेच फिजिकल ट्रेनर ख्रिस्तोफर झुर्ब यांच्या खोल्यांवर पोलिसांनी सोमवारी छापा टाकला. या वेळी उत्तेजके तसेच स्नायू शक्तिवर्धक उत्तेजके सापडल्याचे उडिन पोलीस तुकडीचे प्रमुख अँटोनिओ पिसापिआ यांनी सांगितले.
छाप्यात सापडलेली द्रव्ये आचारसंहितेत मोडणारी आहेत की नाही याबाबत तपशील समजलेला नाही. या द्रव्यांमधील घटकांची तपासणी करण्यात येत आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि कोणाचीही चौकशी सुरू झालेली नाही.
दरम्यान जमैकाच्या थाळीफेकपटू अ‍ॅलिसन रॅनडॉल हिने प्रतिबंधित उत्तेजक सेवन केल्याचे मान्य केले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या जमैका अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान अ‍ॅलिसनने ऑक्सिलफ्रिन या बंदी घातलेल्या उत्तेजकाचे सेवन केल्याचे उघड झाले होते. असाफा आणि शेरोनपाठोपाठ उत्तेजक सेवनाची कबुली देणारी रॅनडॉल जमैकाची तिसरी खेळाडू ठरली आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये जमैकातर्फे थाळीफेकीचा सर्वोत्तम विक्रम रॅनडॉलच्या नावावर होता. चाचणीच्या निर्णयाने चकित आणि धक्का बसल्याची प्रतिक्रिया रॅनडॉलने व्यक्त केली. उर्वरित चाचणीत आपले नाव उत्तेजक सेवन केलेल्या खेळाडूंच्या यादीत नसेल, असे तिने सांगितले.
जमैका अ‍ॅथलीट्स अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएशनने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. उत्तेजकविरोधी व्यवस्थापन राबवण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र प्रतिबंधित उत्तेजकांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या उर्वरित दोन धावपटूंची नावे त्यांनी जाहीर केली नाहीत.