चॅम्पियन्स लीग फुटबॉल

टॉटेनहॅम हॉटस्परविरुद्ध उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्याचा सामना आज; गृहमैदानावर कामगिरी सुधारण्याचे आव्हान

काही दिवसांपूर्वीच झालेल्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्याच्या सामन्यात टॉटेनहॅम हॉटस्परला त्यांच्याच मैदानावर १-० अशी धूळ चारणाऱ्या आयएक्स संघाला आता अंतिम फेरीचे वेध लागले आहेत. बुधवारी मध्यरात्री अ‍ॅमस्टरडॅम एरिना येथे गृहमैदानावर होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यात टॉटेनहॅमवर पुन्हा एकदा सरशी साधून आयएक्स २४ वर्षांचा दुष्काळ संपवणार का, याकडे संपूर्ण फुटबॉलविश्वाचे लक्ष लागले आहे.

आक्रमक व्हॅन डे बीकने लौकिकाला साजेसा खेळ करत आयएक्ससाठी निर्णायक गोल नोंदवून विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्याबरोबरच १९ वर्षीय मॅथिग्स डी’लिट आणि यंदाच्या हंगामात आतापर्यंत सहा गोल करणारा डुसान टॅडिक यांच्यावर आयएक्सची प्रामुख्याने भिस्त राहील. परंतु घरच्या चाहत्यांसमोर खेळताना आयएक्सचा संघ नेहमीच ढेपाळला आहे. गेल्या वर्षभरात घरच्या मैदानावर त्यांना २२ पैकी फक्त ९ सामन्यांत विजय मिळवता आला आहे.

त्यामुळे या कामगिरीत सुधारणा करण्यावरच त्यांचा भर राहण्याची शक्यता असेल.

दुसरीकडे, उपांत्यपूर्व सामन्यात मँचेस्टर सिटीसारख्या बलाढय़ संघाला त्यांच्याच मैदानात पराभूत करणाऱ्या टॉटेनहॅमला त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. हॅरी केन दुखापतीमुळे या सामन्यासाठीसुद्धा अनुपलब्ध असला, तर सन ह्य़ुंग मिनच्या पुनरागमनामुळे टॉटेनहॅमची चिंता काहीशी कमी झाली आहे.

डेले अली, किरन ट्रिपियर यांसारखे अनुभवी आक्रमक व बचावपटू संघात असल्यामुळे टॉटेनहॅम आयएक्सला कडवी झुंज देऊ शकते. एकंदर आयएक्सला या सामन्यासाठी फुटबॉल पंडितांची पसंती मिळत असली तरी, टॉटेनहॅम पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठणार का, हे पाहणेसुद्धा रंजक ठरेल.

संभाव्य संघ (११ खेळाडू)

आयएक्स : आंद्रे ओनाना, डॉमिनिक कोटास्की, व्हॅन ब्लेडेरेन, एरस्मस ख्रिस्टेन्सन, जोएल व्हेल्टमन, मॅथिग्स डी’लिट, व्हॅन डे बीक, डेली ब्लाइंड, पीर शूर्स, डेव्हिड नर्स, दुसान टॅडिक.

टॉटेनहॅम हॉटस्पर : डेव्हिडसन सँचेझ, ह्य़ुगो लॉरिस, किरन ट्रिपियर, डेले अली, लुकास मॉरा, ख्रिस्टियन एरिक्सन, हॅरी विंक्स, सन ह्युंग मिन, व्हिक्टर वनायमा, टॉबी अल्डेरविरल्ड, जॅन व्हर्तोघेन.

चॅम्पियन्स लीगव्यतिरिक्त इतर स्पर्धाच्या गेल्या सहा सामन्यांपैकी पाच लढतींमध्ये टॉटेनहॅमला पराभव पत्करावा लागला आहे.

यंदाच्या चॅम्पियन्स लीगमध्ये घरच्या मैदानावर झालेल्या आतापर्यंतच्या पाच सामन्यांपैकी फक्त दोन सामन्यांमध्येच आयएक्सला विजय मिळवता आला आहे.

२४

१९९५मध्ये २४ वर्षांपूर्वी आयएक्सने चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठून विजेतेपदही मिळवले होते. त्यानंतर मात्र त्यांना अशी कामगिरी करता आलेली नाही.

२-२

यापूर्वी ऑक्टोबरमध्ये अ‍ॅमस्टरडॅम येथे झालेल्या सामन्यात दोन्ही संघांना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.

आयएक्सविरुद्धच्या पहिल्या टप्प्याच्या लढतीत पराभूत झाल्याने संघातील खेळाडू हताश झाले आहेत. परंतु आम्ही यंदा अनेक सामन्यात पिछाडीवरूनच सरशी साधली आहे. त्याशिवाय आयएक्सची त्यांच्या घरच्या मैदानावरील कामगिरी फारशी समाधानकारक नाही. याचाच फायदा घेत आम्ही नक्कीच विजय मिळवू!

– मॉरिसिओ पोशेटिनो, टॉटेनहॅमचे प्रशिक्षक

प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर विजय मिळवल्यामुळे साहजिकच आत्मविश्वास उंचावला आहे. घरच्या चाहत्यांसमोर आम्ही फारशी चमक दाखवू शकलेलो नाही. मात्र विजेतेपदाच्या इतक्या जवळ येऊन हार पत्करणाऱ्यांपैकी माझे खेळाडू नाहीत. त्यामुळे आयएक्सच्या चाहत्यांना आम्ही विजयाची भेट देण्यासाठी सर्वस्व पणाला लावू!

– इरिक टेन हॅग, आयएक्सचे प्रशिक्षक

सामन्याची वेळ : मध्यरात्री १२.३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी टेन २ आणि सोनी टेन २ एचडी