टोक्यो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेतील सॉफ्ट बॉल क्रीडा प्रकारात जापानच्या संघाने सुवर्ण पदक पटकावलं. या विजयानंतर जापानच्या संघाने एकच जल्लोष केला होता. यानंतर खेळाडूंचा त्यांच्या मुळ शहरात सत्कार करण्यात आला. मात्र नागोया शहरातील सत्कार सोहळ्यात वेगळाच प्रकार घडला. सॉफ्टबॉल स्पर्धेतील खेळाडू मियू गोटे हिचं सुवर्ण पदक नागोया शहराच्या महापौरांनी सत्कार सोहळ्यादरम्यान चावल्याने सोशल मीडियावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्यानंतर आता हे सुवर्ण पदक बदलून दिलं जाणार आहे.

मियू गोटोच्या सुवर्ण पदकाचा गौरव करण्यासाठी जपानच्या नागोया शहरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नागोया शहराचे महापौर ताकाशी कावामुरा यांनी पदक स्वत:च्या गळ्यात घातलं आणि आपल्या दाताखाली धरलं. या कृतीमुळे जपानमधील क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. करोना विषाणूच्या नियमावलीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. तसेच खेळाडूच्या कामगिरीचा अपमान असल्याचं देखील नेटकऱ्यांनी सांगितलं आहे. टोक्यो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेच्या आयोजकांनी तात्काळ दखल घेतली आहे. ” आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि गोटोच्या संमतीनंतर सुवर्ण पदक बदलून दिलं जाणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती याचा खर्च उचलणार आहे.”, असं टोक्यो २०२० स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितलं. मियू गोटो आणि महापौर कावामुरा यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

“दुसऱ्या कसोटीसाठी विराटने चुकीची टीम निवडली”; माजी क्रिकेटपटूचा आक्षेप

जापानच्या सॉफ्टबॉल संघाने १३ वर्षापूर्वी बीजिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. बीजिंग ऑलिम्पिकनंतर हा खेळ ऑलिम्पिकमधून काढण्यात आला होता. मात्र टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याचा पुन्हा समावेश करण्यात आला आणि १३ वर्षानंतर पुन्हा एकदा जापाननं सुवर्ण पदक पटकावलं. पॅरिस २०२४ स्पर्धेत पुन्हा हा खेळ नसेल. त्यानंतर लॉस एजिल्सस २०२८ स्पर्धेत पुन्हा या खेळाचा समावेश असणार आहे.