Jasprit Bumraah Sanjana Ganesan Became Parents: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर होता. आशिया चषकाच्या निमित्ताने पुन्हा बुमराहची धडाकेबाज खेळी पाहायला मिळणार असा विचार करून चाहते आनंदी झाले होते. पण आयत्या वेळी बुमराहला श्रीलंकेतून पुन्हा मायदेशी परतावे लागले. रविवारी तातडीने बुमराह कोलंबो येथून निघाला व मुंबईत पोहोचला. बुमराहने खाजगी काम असल्याने आशिया चषकात पुढे खेळता येणार नसल्याचे सांगितले होते. इतक्या मोठ्या ब्रेकनंतर आता पुन्हा बुमराह दिसणार नाही म्हणून पुन्हा चाहते नाराज झाले होते पण आता ही नाराजी दूर करणारी अत्यंत गोड बातमी बुमराहने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
जसप्रीत बुमराह व संजना गणेशन या गोड जोडप्याने एका गोड बाळाला जन्म दिला आहे. बुमराहने आपल्या ट्विटर अकाउंटवरून आपल्याला मुलगा झाल्याची माहिती दिली आहे. “आमचे छोटेसे कुटुंब आता मोठे झाले आहे. आज सकाळी आमच्या लहान बाळाने आमच्या आयुष्यात प्रवेश केला आहे. अंगद जसप्रीत बुमराहचे आम्ही जगात स्वागत करतो. आमच्या आयुष्यातील हा नवीन अध्याय व त्याला जोडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत – जसप्रीत आणि संजना” असे ट्वीट बुमराहने केले आहे.
जसप्रीत बुमराह- संजना गणेशन झाले आई- बाबा
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन यांनी १५ मार्च २०२१ रोजी गोव्यात एका खासगी समारंभात लग्न केले होते. संजना गणेशन तिच्या कामाप्रती खूपच प्रामाणिक आहे अगदी लग्नानंतर आठवड्याभरातच ती कामावर परतली होती. WPL 2023 दरम्यान, संजना गणेशनचा एक फोटो व्हायरल झाला होता ज्यात तिचा बेबी बंप दिसत असल्याची चर्चा होती पण बुमराह किंवा संजना दोघांपैकी कोणीही या चर्चांना दुजोरा दिला नव्हता. आज दोघांनी आपल्या नव्या बाळाचा गोड फोटो शेअर करतच सर्वांना ही बातमी दिली आहे.