जयराम जटचा अडचणींवर मात करणारा प्रेरणादायी प्रवास

‘‘माझ्या वडिलांचे १९९२मध्ये निधन झाले. तेव्हा मी जेमतेम पाचवीत होतो. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. त्यामुळे काम करून पोट भरण्याशिवाय पर्याय नव्हता. शाळा सुरू ठेवायचा निर्धार पक्का होता. पण पैशांसाठी इमारतींमध्ये गवंडी काम करायला जायचो. दिवसाचे दहा रुपये मजुरी मिळायची. पण दहावी झाल्यावर मात्र पुढील शिक्षणाचा खर्च परवडणारा नव्हता. त्यासाठी दिल्ली गाठली. तिथे सुक्यामेव्याच्या बाजारात हमालीचे काम करायला सुरुवात केली. शिक्षणाबरोबर कशीबशी गुजराण होत होती. २००० साली सेनादलात काम करण्याची संधी मिळाली. तिथून बास्केटबॉलला सुरुवात झाली आणि आता यूबीए प्रो-बास्केटबॉलच्या लीगच्या माध्यमातून अमेरिकावारीही घडली. स्वप्नातही मी हा विचार केला नव्हता,’’ असा आपल्या आयुष्याचा थक्क करणारा प्रवास जयराम जट सांगत होता.

‘‘दिल्लीमध्ये सुक्यामेव्याच्या गोणी उचलून दिल्ली स्थानकात नेणे आणि तिथून बाजारात आणण्याचे काम मी करत होतो. पण शिक्षण मात्र सुरूच ठेवले होते. त्यामुळेच मला सेनादलामध्ये जाण्याची संधी मिळाली. सेनादलात दाखल झालो तेव्हा बास्केटबॉलशी माझा काडीचाही संबंध नव्हता. जिथे जेवणाचे हाल, तिथे हा खेळ परवडणारा नव्हताच. सेनादलातल्या एका अधिकाऱ्याने माझी शरीरयष्टी पाहिली आणि मला बास्केटबॉल खेळायचे सुचवले. तिथून खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली,’’ असे जयराम सांगत होता.

आपल्या अमेरिकावारीबद्दल जयराम म्हणाला की, ‘‘यूबीए लीगमुळे माझे आयुष्यच बदलून गेले. या लीगमुळे मला चांगले व्यासपीठ मिळाले. चेन्नई स्लॅम्स संघाकडून मी दोन वर्षे खेळत आहे. माझी कामगिरी पाहून या लीगच्या आयोजकांनी मला अमेरिकेतील ‘एनबीए’ची स्पर्धा पाहण्यासाठी नेले. हा माझ्यासाठी सुवर्णयोग होता. मला अमेरिकेत जाऊन हा खेळ नव्याने समजला. त्यामुळे माझ्या खेळात मोठा बदल झाला.’’

बदललेल्या आयुष्याबद्दल जयराम म्हणाला की, ‘‘आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला चांगली माणसे मिळाली, त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत मजल मारू शकलो. दिल्लीमध्ये जिथे मी काम करत होतो, तिथले माजी सहकारी आता माझ्या प्रगतीवर भरपूर खूश आहेत. सेनादल आणि बास्केटबॉल यांच्यामुळे माझी आर्थिक बाजूही सक्षम झाली. ज्या बास्केटबॉलने मला भरभरून दिलं, त्या खेळाची सेवा कायम करत राहण्याचा माझा मानस आहे. त्यामुळे आता फक्त बास्केटबॉल हेच माझं आयुष्य आहे.’’

यूबीए लीगमुळे भारतात खेळाची चांगली प्रगती होईल, असे जयरामने सांगितले. तो पुढे म्हणाला की, ‘‘ही लीग म्हणजे बास्केटबॉल खेळाडूंसाठी पर्वणीच आहे. लीगमधील परदेशी खेळाडूंमुळे आम्हाला बरेच काही शिकता आले. आमच्या खेळातील वेग आणि अचूकता वाढली. ज्या पद्धतीने ही लीग सुरू आहे ते पाहता भारतात बास्केटबॉलचे भविष्य उज्ज्वल आहे.’’