कर्नाटकसमोर २९२ धावांचे लक्ष्य
राहुल त्रिपाठी व श्रीकांत मुंडे यांनी केलेल्या शानदार खेळामुळेच महाराष्ट्राला रणजी करंडक क्रिकेट सामन्यात कर्नाटकपुढे विजयासाठी २९२ धावांचे आव्हान ठेवता आले. उर्वरित खेळात कर्नाटकने दुसऱ्या डावात १ बाद ६१ धावा केल्या.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात महाराष्ट्राने २ बाद १३ या धावसंख्येवर दुसरा डाव पुढे सुरू केला. संग्राम अतितकर (१३) व अंकित बावणे (०) यांचे बळी त्यांनी लवकर गमावले. भरवशाचा आंतरराष्ट्रीय फलंदाज केदार जाधव हा पुन्हा अपयशी ठरला. त्याने केवळ ११ धावा केल्या. एका बाजूने आत्मविश्वासाने खेळणाऱ्या त्रिपाठीला विशांत मोरेने साथ देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ४० धावांची भर घातली नाही तोच मोरे २६ धावांवर बाद झाला. त्या वेळी महाराष्ट्राची ६ बाद ११३ अशी दयनीय स्थिती होती.
त्रिपाठी याला मुंडे याची साथ मिळाली व या जोडीने संघाचा डाव सावरला. त्यांनी सातव्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. त्यामुळेच महाराष्ट्रास दोनशे धावांपलीकडे पोहोचता आले. त्रिपाठी याने ३१८ मिनिटांच्या खेळात १२ चौकारांसह ७८ धावा केल्या. मुंडे याने केलेल्या ८१ धावांमध्ये सात चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. ही जोडी फुटल्यानंतर महाराष्ट्राचा डाव २६० धावांमध्ये गुंडाळण्यात कर्नाटकला यश मिळाले. कर्नाटकचा कर्णधार आर. विनयकुमार याने चार बळी घेतले, तर श्रीनाथ अरविंद याला तीन बळी मिळाले. कर्नाटकच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांचा सलामीवीर रविकुमार समर्थ याला निकित धुमाळ याने केवळ सात धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर मयांक अगरवाल (नाबाद २३) व रॉबिन उथप्पा (नाबाद २५) यांनी संघाचा डाव सावरला. कर्नाटकला विजयासाठी शुक्रवारी शेवटच्या दिवशी आणखी २३१ धावांची आवश्यकता आहे. खेळपट्टी महाराष्ट्राच्या गोलंदाजांना कशी साथ देते यावर निकाल अवलंबून आहे.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : २१२ व ९३ षटकांत सर्व बाद २६०(राहुल त्रिपाठी ७८, श्रीकांत मुंडे ८१, विशांत मोरे २६, विनयकुमार ४/७१, श्रीनाथ अरविंद ३/५९, श्रेयस गोपाळ २/२६). कर्नाटक : १८० व १५ षटकांत १ बाद ६१.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka maharashtra clash set for exciting finish
First published on: 04-12-2015 at 01:14 IST