अनेक आंतरराष्ट्रीय शर्यती जिंकणाऱ्या जोसेफ किपकोच या केनियाच्या खेळाडूला आगामी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीसाठी अग्रमानांकन देण्यात आले आहे. ही शर्यत रविवारी येथे आयोजित करण्यात आली आहे.
जोसेफ याची २ तास १० मिनिटे २५ सेकंद ही सर्वोत्तम वेळ आहे. इथिओपियाचे येशिगेता तामिरु बेकेले व रोबेल आलेमयेह्य़ू (दोघेही प्रत्येकी २ तास १० मिनिटे ३१ सेकंद) यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे मानांकन मिळाले आहे. इथिओपियाच्या या दोन खेळाडूंसह बारा खेळाडूंनी पहिल्या पंधरा मानांकित खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. पुरुष अर्धमॅरेथॉनमध्ये इथिओपियाचे लेमा तादिसी (एक तास ५१ सेकंद), लेऊलेकल बेले (एक तास १ मिनिट १५ सेकंद) व असरत मेलाकू कासिक (एक तास १ मिनिट २१ सेकंद) या तीन खेळाडूंना अनुक्रमे पहिले तीन मानांकन मिळाले आहे.
महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये एगेरेर मकोनेन (एक तास ९ मिनिटे १३ सेकंद) या इथिओपियाच्या खेळाडूला अव्वल मानांकन मिळाले असून केनियाची जोसेफाईन किमुयु (एक तास १० मिनिटे ३३ सेकंद) हिला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. इथिओपियाची एटाफेराहू तेम्सेन (एक तास ११ मिनिटे) हिने तिसरे मानांकन मिळविले आहे. यंदाची मॅरेथॉन शर्यत पहाटे पावणेसहा वाजता सुरू होणार आहे. पहाटे असलेल्या थंडगार हवामानाचा फायदा परदेशी खेळाडूंना जास्त मिळण्याची शक्यता आहे.