मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा

तब्बल ३४ वर्षांपूर्वी १७ जानेवारी, १९८७ला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताचा माजी फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनने एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले शतक साकारले होते. गुरुवारी पुन्हा एकदा वानखेडेवर अझरची आतषबाजी पाहायला मिळाली. परंतु यावेळी केरळचा प्रतिभावान फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनने (५४ चेंडूंत नाबाद १३७ धावा) मुंबईच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्याच्या शतकाच्या बळावरच केरळने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा आठ गडी आणि २५ चेंडू राखून धुव्वा उडवला.

२६ वर्षीय अझरुद्दीनने नऊ चौकार आणि ११ षटकारांची आतषबाजी करताना अवघ्या ३७ चेंडूंत शतक झळकावले. या स्पर्धेतील हे दुसऱ्या क्रमांकाचे जलद शतक ठरले. दिल्लीच्या ऋषभ पंतने २०१८मध्ये अवघ्या ३२ चेंडूंत शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. केरळच्या एखाद्या फलंदाजांने मुश्ताक अली स्पर्धेत शतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. अझरुद्दीनला रॉबिन उथप्पा (३३) आणि कर्णधार संजू सॅम्सन (२२) यांची उत्तम साथ लाभल्याने केरळने १९७ धावांचे लक्ष्य १५.५ षटकांत गाठून दुसऱ्या विजयाची नोंद केली.

प्रथम फलंदाजी करताना कर्णधार सूर्यकुमार यादव (३८), आदित्य तरे (४२) आणि यशस्वी जैस्वाल (४०) यांच्या फटकेबाजीमुळे मुंबईने २० षटकांत ७ बाद १९६ धावा केल्या. परंतु गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे मुंबईला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : २० षटकांत ७ बाद १९६ (आदित्य तरे ४२, सूर्यकुमार यादव ३८; के. एम. आसिफ ३/२५) पराभूत वि. केरळ : १५.५ षटकांत २ बाद २०१ (मोहम्मद अझरुद्दीन नाबाद १३७, रॉबिन उथप्पा ३३; शाम्स मुलानी १/४१)