ऑस्ट्रेलियन संघाने अ‍ॅशेस मालिकेत ५-० ने दिलेल्या व्हाईटवॉशची परतफेड २०१५ सालच्या मालिकेत करण्याचा निर्धार केल्याचे सांगत इंग्लंड संघाचा फलंदाज केव्हिन पीटरसनने त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
अभेद्य ऑस्ट्रेलिया!
मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियान संघाने जबरदस्त सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करत इंग्लंडविरुद्ध ५-० ने संस्मरणीय विजय साकारल्यानंतर यापुढील इंग्लंड संघात फेरबदल होण्याची चिन्हे होती. त्याचबरोबर केव्हिन पीटरसनही निवृत्ती जाहीर करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यात पीटरसनची या मालिकेदरम्यान, नावलौकिकाला साजेल अशी कामगिरीही झाली नव्हती. पीटरसनला अ‍ॅशेस मालिकेत केवळ २९.४०च्या सरासरीने केवळ २९४ धावा करता आल्या.
केव्हिन पीटरसन म्हणतो, “स्वत:ची कमकुवत कामगिरी आणि संघाचा निराशाजनक पराभव यामुळे मी व्यथित आहे. संघाच्या कठीण परिस्थितीतसुद्धा इंग्लंडच्या सर्व चाहत्यांनी संघाला दिलेल्या पाठिंब्याचे मी आभार व्यक्त करतो आणि पुढच्या २०१५ सालच्या मालिकेत आम्ही पराभवाची परतफेड नक्की करू” असे म्हणत पीटरसन आपल्या निवृत्तीच्या चर्चेवर पडदा, तर टाकलाच त्याचबरोबर चांगल्या कामगिरीतून संघाला यश मिळवून देण्याचा विश्वासही व्यक्त केला.