सूर गवसलेल्या किदम्बी श्रीकांतकडून मंगळवारपासून सुरू होणाऱ्या कोरिया मास्टर्स वर्ल्ड टूर सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रमुख आशा अवलंबून असतील. महिला एकेरीत सायना नेहवालने स्पर्धेतून माघार घेतली आहे.
इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्यानंतर श्रीकांत विजयासाठी झगडताना आढळत होता. गेल्या आठवडय़ात झालेल्या हाँगकाँग खुल्या स्पर्धेत त्याने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून लक्ष वेधले आहे. इंडिया खुल्या स्पर्धेनंतर प्रथमच श्रीकांतने अंतिम चौघांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळेच त्याने अपेक्षा उंचावल्या आहेत.
पुरुष एकेरीत श्रीकांतची सलामीला गाठ हाँगकाँगच्या वाँग विंग कि व्हिन्सेंटशी पडणार आहे. जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतची वाँग विंगविरुद्धची कामगिरी १०-३ अशी सकारात्मक आहे.
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेली सायना गेल्या अनेक स्पर्धामध्ये कामगिरी उंचावू शकलेली नाही. हाँगकाँग स्पर्धेतून माघार घेणारी सायना पुढील आठवडय़ात होणाऱ्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महिला एकेरीत भारताची एकही स्पर्धक नसेल. याचप्रमाणे दुहेरीतही भारताच्या कोणत्याही जोडीने सहभाग घेतलेला नाही.
जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानावरील समीर वर्मा पहिल्या फेरीत चीनचा अग्रमानांकित शि यू क्विशी सामना करणार आहे. त्याचा भाऊ सौरभ वर्माला पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागणार आहे. शुभंकर डे याची पहिल्या फेरीत चीनच्या द्वितीय मानांकित चेन लाँगशी गाठ पडणार आहे.