चॅम्पियन्स लीगमधील लिव्हरपूलविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील ११ खेळाडूंना बार्सिलोनाने विश्रांती दिल्यानंतर त्यांना ला लीगा फुटबॉल स्पर्धेत शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात सेल्टा व्हिगोकडून ०-२ अशा पराभवाचा सामना करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिओनेल मेसी, लुइस सुआरेझ, फिलिपे कुटिन्हो यांसारख्या अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या बार्सिलोनाच्या दुसऱ्या फळीच्या संघाला आपला खेळ उंचावताच आला नाही. त्यातच औसमाने डेम्बेले याला दुखापतीमुळे पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच मैदान सोडावे लागले. डेम्बेलेच्या मांडीचे स्नायू ताणले असले तरी तो लिव्हरपूल विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यापर्यंत तंदुरुस्त होईल, अशी आशा बार्सिलोनाने व्यक्त केली.

गेल्या आठवडय़ात बार्सिलोनाने ला लीगाच्या विजेतेपदावर कब्जा केल्यामुळे त्यांना या पराभवाने फारसा फरक पडणार नाही. मात्र या विजयामुळे सेल्टा व्हिगोचा आत्मविश्वास उंचावला असून तळाच्या तीन संघांपेक्षा ते पाच गुणांनी आघाडीवर आहेत. मॅक्सिमिलानो गोंझालेझ (६७व्या मिनिटाला) आणि इयागो अस्पास याने (८८व्या मिनिटाला) पेनल्टीवर केलेल्या गोलाच्या बळावर सेल्टा व्हिगोने हा सामना आरामात जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: La liga football tournament
First published on: 05-05-2019 at 23:23 IST