बाली : भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेन आणि अनुभवी पारुपल्ली कश्यप इंडोनेशिया बॅडिमटन खुल्या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत गारद झाले. 

पुरुष एकेरीत २१ वर्षीय लक्ष्यला अव्वल मानांकित जपानच्या केंटो मोमोटाकडून २१-२३, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. लक्ष्यने दोन वेळच्या जगज्जेत्या मोमोटाला उत्तम लढा दिला. मात्र, दोघांमध्ये २१-२१ अशी बरोबरी असताना मोमोटाने खेळ उंचावत पुढील दोन्ही गुण जिंकले. दुसऱ्या गेममध्येही लक्ष्यने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फायदा झाला नाही. दुसरीकडे, सिंगापूरच्या लो किन येवने कश्यपला २१-११, २१-१४ अशी धूळ चारली. पुरुष दुहेरीत, एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांचेही आव्हान संपुष्टात आले. त्यांच्यावर कोरियाच्या चोइ सोलग्यू आणि किम वोन्होने २०-२२, १३-२१ अशी मात केली. तसेच मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत वेंकट गौरव प्रसाद आणि जुही देवांगणचा योनस राल्फी जेन्सन आणि लिंडा एल्फेर या जर्मन जोडीने १२-२१, ४-२१ असा पराभव केला.