अवकाळी गारपीटीचा प्रकोप महाराष्ट्रातील नागरिकांनी काही दिवसांपूर्वीच अनुभवला. ही गारपीट केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून सख्खे शेजारी असलेल्या बांगलादेशमध्ये गारपीटीने आकस्मिक हजेरी लावली. आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकातील श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मुसळधार पाऊस आणि गारपीटीचे लक्ष्य बनला. रंगतदार होऊ पाहणारा हा सामना निसर्गाच्या खप्पा मर्जीमुळे अर्धवटच थांबला आणि डकवर्थ-लुइस पद्धतीद्वारे श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले. या विजयासह श्रीलंकेने सलग दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. रविवारी त्यांची भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेत्याशी लढत होईल. मात्र गारपीटीमुळे गतविजेत्या वेस्ट इंडिजचे अंतिम फेरीत मजल मारण्याचे मनसुबे अर्धवटच राहिले.
सामन्याच्या आधी नियमित कर्णधार दिनेश चंडिमलने या महत्त्वपूर्ण लढतीतून माघार घेतली आणि कर्णधारपदाची जबाबदारी लसिथ मलिंगाने स्वीकारली. मलिंगाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कुशल परेरा आणि तिलकरत्ने दिलशान यांनी ४१ धावांची सलामी दिली. क्रिश्मर सँटोकीने परेराला बाद करत ही जोडी फोडली. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात महेला जयवर्धने भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यापाठोपाठ कुमार संगकाराही माघारी परतल्याने श्रीलंकेची ३ बाद ४९ अशी अवस्था झाली. यानंतर दिलशानने लहिरु थिरिमानेच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी करत डाव सावरला. सिमन्सच्या थेट धावफेकीमुळे दिलशानची ३९ धावांची खेळी संपुष्टात आली. अँजेलो मॅथ्यूजने थिरिमानेला साथ देत श्रीलंकेच्या डावाला आकार दिला. या दोघांच्या संयमी खेळींमुळेच श्रीलंकेने दीडशेचा टप्पा ओलांडला. थिरिमानेने ४४ तर मॅथ्यूजने ४० धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजतर्फे सँटोकीने सर्वाधिक २ बळी घेतले.
या लक्ष्याचा पाठलाग करताना ड्वेन स्मिथने वेगवान सुरुवात केली मात्र लसिथ मलिंगाने एकाच षटकात स्मिथ आणि गेलला बाद करत वेस्ट इंडिजला अडचणीत आणले. सिमन्सला पायचीत करत सीकुगे प्रसन्नने वेस्ट इंडिजला आणखी एक धक्का दिला. वाढत्या धावगतीचे आव्हान समोर असतानाही मार्लन सॅम्युअल्स आणि ड्वेन ब्राव्हो यांनी चौथ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजचा विजय आवाक्यात ठेवला. मात्र कुलसेकराने ब्राव्होला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ३० धावा केल्या. ब्राव्हो बाद झाल्यानंतर कर्णधार डॅरेन सॅमी अवतरला. मात्र १३.५ षटकांत ४ बाद ८० धावा असताना पावसाचे आगमन झाले. त्यानंतर गारपीटही झाली. दोन्हीचा जोर वाढतच गेल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामना थांबला तेव्हा डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे श्रीलंकेचा संघ २७ धावांनी पुढे असल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. मॅथ्यूजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक :
श्रीलंका : २० षटकांत ६ बाद १६० (लहिरू थिरिमाने ४४, अँजेलो मॅथ्यूज ४०, क्रिश्मर सँटोकी २/४६) विजयी विरुद्ध वेस्ट इंडिज : १३.५ षटकांत ४ बाद ८० (ड्वेन ब्राव्हो ३०, लसिथ मलिंगा २/५)
सामनावीर : अँजेलो मॅथ्यूज.