बार्सिलोना : दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू म्हणून आलेल्या सर्वोत्तम फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या दोन गोलमुळे बार्सिलोनाला ला-लिगा फुटबॉलमध्ये रेयाल बेटिसवर ५-२ असा विजय मिळवता आला. त्यामुळे चार सामन्यांनंतर बार्सिलोनाला या स्पर्धेत विजयाची नोंद करता आली.

पहिल्या सत्रात बार्सिलोनाला १-१ बरोबरी स्वीकारावी लागली होती. अखेर मेसीने ६१व्या मिनिटाला पेनल्टीवर आणि ८२व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाच्या विजयात योगदान दिले.

बार्सिलोनाकडून अन्य गोल उस्माने डेम्बले (२२वे मिनिट), अ‍ॅँटोनी ग्रिझमन (४९वे मिनिट) आणि प्रेडी गोंझालेझ (९० वे मिनिट) यांनी नोंदवले. १७ वर्षीय गोंझालेझचा हा ला-लिगामधील पहिला गोल ठरला. विजयी सूर गवसला तरी बार्सिलोना अद्याप आठव्या स्थानी आहे.

लीग-१ फुटबॉल : पॅरिस सेंट-जर्मेनचा सलग आठवा विजय

पॅरिस : अँजेल डी मारियाच्या दोन गोलांमुळे (२१वे आणि ७३वे मिनिट) पॅरिस सेंट-जर्मेनने लीग १ फुटबॉलमध्ये रेनेसला ३-० असे नमवत सलग आठव्या विजयाची नोंद केली. १० सामन्यांतून याबरोबरच पॅरिस सेंट-जर्मेनने २४ गुणांसह अग्रस्थान पटकावले. पॅरिस सेंट जर्मेनला दुसऱ्या स्थानी असणाऱ्या लिली संघावर पाच गुणांची आघाडी घेता आली आहे.

इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल : मॅँचेस्टर युनायटेड विजयपथावर

मॅँचेस्टर : मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (ईपीएल) एव्हर्टनला ३-१ असे पराभूत केले. ईपीएलमध्ये तर युनायटेडची १५व्या स्थानी घसरण झाली होती. अखेर एव्हर्टनविरुद्ध ब्रुनो फर्नाडेसच्या (२५वे मिनिट आणि ३२वे मिनिट) दोन गोलमुळे युनायटेडला विजय साध्य करता आला. एडिनसन कवानीनेही अखेरच्या मिनिटात गोलचे योगदान दिले.