लंडन : दिग्गज माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू लिसा स्थळेकर ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या महासंघाची (एफआयसीए) पहिली महिला अध्यक्ष असणार आहे.

स्वित्झर्लंडच्या न्यो येथे झालेल्या ‘एफआयसीए’च्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी ऑस्ट्रेलियाची ४२ वर्षीय माजी कर्णधार स्थळेकरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज बॅरी रिचर्डस, वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू जिमी अ‍ॅडम्स आणि इंग्लंडचा माजी फलंदाज विक्रम सोळंकी यांनी यापूर्वी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. ‘एफआयसीए’ आणि खेळाडूंची जागतिक संघटना यांमध्ये झालेल्या खेळाडू विकास परिषदेआधी कार्यकारिणी समितीची बैठक झाली. करोना साथीनंतर प्रथमच ही व्यक्तिश: बैठक पार पडली.

‘‘सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर स्थळेकरची ‘एफआयसीए’च्या अध्यक्षपदी निवड करताना आनंद होत आहे. ती पहिली महिला अध्यक्ष आहे. लिसा या पदासाठी सर्वोत्तम उमेदवार होती. माजी खेळाडू आणि विश्लेषक म्हणूनही तिची ओळख आहे,’’असे ‘एफआयसीए’चे कार्यकारी अध्यक्ष हीथ मिल्स यांनी सांगितले.

स्थळेकरने ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही प्रकारांत मिळून १८७ आंतरराष्ट्रीय सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. २००५ व २०१३ या एकदिवसीय विश्वचषक आणि २०१० व २०१२च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघातही तिचा सहभाग होता. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय प्रकारातील विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर तिने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.