माझे क्रिकेट पदार्पण इंग्लंडमध्ये झाले, जे माझ्या आईचे जन्मस्थान आहे, तर अशा ठिकाणी माझ्या कारकिर्दीचा शेवट होतोय, जिथे मी जन्मले त्या भारतात कारकिर्दीचा शेवट झाल्याने मी आनंदित झाले आहे, असे ऑस्ट्रेलियाची अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू लिसा स्थळेकर निवृत्तीची घोषणा केल्यानंतर बोलत होती.
ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकल्याचा आनंद तर आहेच, पण त्यापेक्षा जास्त आनंद संघाच्या विजयात हातभार लावल्याचा आहे. यापेक्षा जास्त कारकिर्दीत काही लिहिले जाईल, असे मला वाटत नाही. विश्वविजयी संघाचा एक भाग होणे नक्कीच सुखावह असते, असे लिसा म्हणाली.
लिसाचा जन्म पुण्यातला, पण जास्त काळ ती भारतात राहिली नाही. तरीही भारताबद्दल तिच्या मनात प्रेम आणि आपुलकी आहे. या साऱ्या भावना तिने निवृत्तीचा निर्णय घेताना व्यक्त केल्या. अंतिम फेरीत लिसाने दोन महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवल्या आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
विश्वचषकाला येण्यापूर्वीच मी निवृत्ती घेण्याचा विचार केला होता, पण त्याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. पण माझ्या कुटुंबीयांना आणि काही खास मित्र-मैत्रिणींना मी हा निर्णय सांगितला होता. निवृत्तीचा निर्णय घेताना मी भावनिक झाले आहे. माझ्या आयुष्यातला हा एक अविभाज्य भाग आहे. दहा वर्षांची असल्यापासून मी क्रिकेट खेळायला लागले. त्यामुळे आता क्रिकेट खेळायचे नाही, हा विचार धक्कादायक आहे. पण आता मिळालेल्या मोकळ्या वेळेचा मी नक्कीच चांगला फायदा उचलेन आणि या आयुष्याचाही आनंद लुटेन, असे लिसा म्हणाली.
विश्वचषक जिंकणे हे माझ्यासाठी अविस्मरणीय असेच होते. जे मला मिळवायचे होते, जे ध्येय मी ठेवले होते, ते पूर्ण झाल्यावर निवृत्तीचा निर्णय घेणे योग्य आहे, असे मला वाटते.
२००१ साली लिसाने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या कालावधीत लिसा ८ कसोटी , १२५ एकदिवसीय आणि ५४ ट्वेन्टी-२० सामने खेळली. १२ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये लिसाने कसोटीत ४१६, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २७२८ आणि ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये ७६९ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० धावा करणारी आणि १०० विकेट्स मिळवणारी लिसा पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. कसोटीत २३, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४६ आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ६० विकेट्स तिच्या नावावर आहेत.
आयसीसीच्या महिला विश्वचषकाच्या संघात एकही भारतीय नाही
मुंबई : विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) विश्वचषकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंचा संघ बनवला असून यामध्ये एकाही भारतीय क्रिकेटपटूचे नाव नाही. या संघात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंचा वरचष्मा असून ईशानी कौशल्या ही श्रीलंकेची एकमेव आशियाई क्रिकेटपटू या संघात आहे. विश्वचषकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरलेल्या न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.
आयसीसीचा महिला विश्वचषक संघ : सुझी बेट्स (न्यूझीलंड, कर्णधार), चार्लेट एडवर्ड्स, कॅथेरीन ब्रुंट, होली कोल्विन, अॅना श्रुबसोल (इंग्लंड), राचेल हायेन्स, जॉडी फिल्ड्स, मेगान शट (ऑस्ट्रेलिया), स्टेफनी टेलर, डिएन्ड्रा डॉटिन (वेस्ट इंडिज), ईशानी कौशल्या (श्रीलंका). १२ वी खेळाडू : होली फर्लिग (ऑस्ट्रेलिया).
आयसीसी अध्यक्षांकडून बीसीसीआयचे आभार
मुंबई : महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष अॅलन इसाक यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे आभार मानले आहेत. महिला क्रिकेटपटूंना जागतिक स्पर्धेत आपल्या कौशल्याची छाप पाडण्याची संधी दिल्याबद्दल इसाक यांनी संयोजक, पुरस्कर्ते आणि स्वयंसेवक यांचीही प्रशंसा केली आहे. महिला विश्वचषक स्पर्धा आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेमुळे अनेक महिलांना या खेळाकडे वळण्याची प्रेरणा मिळेल, असेही इसाक यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2013 रोजी प्रकाशित
कारकिर्दीचा शेवट भारतात झाल्याचा आनंद -लिसा स्थळेकर
माझे क्रिकेट पदार्पण इंग्लंडमध्ये झाले, जे माझ्या आईचे जन्मस्थान आहे, तर अशा ठिकाणी माझ्या कारकिर्दीचा शेवट होतोय, जिथे मी जन्मले त्या भारतात कारकिर्दीचा शेवट झाल्याने मी आनंदित झाले आहे, असे ऑस्ट्रेलियाची अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू लिसा स्थळेकर निवृत्तीची घोषणा केल्यानंतर बोलत होती. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकल्याचा आनंद तर आहेच,
First published on: 19-02-2013 at 02:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lisa sthalekar happy to end career in india