राजधानी दिल्लीत भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱया एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. फिरोजशहा कोटला स्टेडियमवर झालेल्या या रंगतदार लढाईत न्यूझीलंडने ६ धावांनी विजय प्राप्त केला. सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. न्यूझीलंडच्या २४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून केदार जाधवची ४१ धावांची खेळी वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. कर्णधार धोनीने भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण यावेळी तो मॅच विनर ठरू शकला नाही. साऊदीच्या गोलंदाजीवर धोनी (३९) झेलबाद झाला. त्यानंतर हार्दिक पंड्याने भारतीय संघाच्या विजयाची आशा अखेरच्या षटकापर्यंत जिवंत ठेवली होती. मात्र हार्दिक ३६ धावांवर बाद झाल्यानंतर संघाच्या विजयाच्या आशा पूर्णपणे मावळल्या. अखेरच्या षटकात टीम साऊदीने बुमराहला शून्यावर माघारी धाडून किवींनी विजयी जल्लोष साजरा केला. उमेश यादवने नाबाद १८ धावांची खेळी केली. न्यूझीलंडने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत आता १-१ अशी बरोबरी साधली आहे. न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात अतिशय संथ गतीने झाली होती. त्यात रोहित शर्मा केवळ १५ धावा करून माघारी परतला. तर कोहली देखील यावेळी आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. कोहली (९) सँटनरच्या फिरकीवर यष्टीरक्षक ल्युक राँचीकरवी झेलबाद झाला. रहाणे देखील मोठा फटका मारण्याच्या नादात अँडरसनकरवी झेलबाद होऊन माघारी परतला. संघातील अनुभवी फलंदाज स्वस्तात तंबूत दाखल झाल्यानंतर धोनीने केदार जाधवच्या साथीने संघाचा डाव सावरण्यास सुरूवात केली होती. केदार जाधवने यावेळी विश्वासू खेळी साकारली. त्याने ३७ चेंडूत ४१ धावा केल्या. तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या शतकी खेळीच्या जोरावर किवींना यावेळी २४२ धावांपर्यंत मजल मारता आली. लॅथमने ४६ धावांचे योगदान दिले. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणताही न्यूझीलंडचा फलंदाच चांगली कामगिरी करू शकला नाही. विल्यमसन ११८ धावांवर बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ गडगडला. अखेरच्या दहा षटकांत भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंच्या धावसंख्येला चांगलाच लगाम घातला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. धोनीचा निर्णय सार्थकी लावत उमेश यादवने पहिल्याच षटकात मार्टिन गप्तील याला क्लीनबोल्ड करून दमदार सुरूवात करून दिली. मात्र, त्यानंतर आलेल्या केन विल्यमसनने यावेळी विश्वासू खेळी साकारून संघाचा डाव सावरला. विल्यमसनने टॉम लॅथमच्या साथीने दुसऱया विकेटसाठी तब्बल १२० धावांची भागीदारी रचली. विल्यमसन आणि लॅथम जोडी भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत होती. अशावेळी धोनीने गोलंदाजीत बदल करून केदार जाधवला गोलंदाजीस पाचारण केले आणि त्याने भारतीय संघाला यश मिळवून दिले. जाधवने लॅथमला माघारी धाडून भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. लॅथम बाद झाल्यानंतरही विल्यमसनने रॉस टेलरला साथीला घेऊन आपले शतक पूर्ण केले. विल्यमसनचे हे भारतीय संघाविरुद्धचे पहिलेवहिले एकदिवसीय शतक ठरले. तर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील त्याचे हे आठवे शतक आहे. रॉस टेलरवर अमित मिश्राने चांगला दबाव निर्माण केला होता, मग धावसंख्येला गती देण्याच्या नादात रॉस टेलरने मोठा फटका मारण्याची चूक केली. टेलर २१ धावांवर झेलबाद झाला. त्यापाठोपाठ केन विल्यमसन देखील ११८ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. विल्यमसन बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. ठराविक अंतराने न्यूझीलंडच्या विकेट्स एकामागोमाग एक पडत राहिल्या आणि सरतेशेवटी किवींनी २४२ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून बुमराह आणि मिश्रा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादव, अक्षर पटेल आणि केदार जाधव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. Live Cricket Score of India vs New Zealand :