आठवडय़ाची मुलाखत : अरुण केदार, भारताचे कॅरम प्रशिक्षक
अनुभवी आणि युवा खेळाडूंचा संघामध्ये उत्तम समन्वय असून विश्व अजिंक्यपद स्पर्धेवर भारतच नाव कोरेल, असा विश्वास प्रशिक्षक आणि माजी आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अरुण केदार यांनी व्यक्त केला.
इंग्लंडच्या बर्मिगहॅम शहरात ७ ते ११ नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणाऱ्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या स्पर्धेत एकूण १७ देशांचा समावेश असून आशियाई देशांमध्ये अधिक चुरस रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या स्पध्रेतील आव्हानांविषयी केदार यांच्याशी केलेली खास बातचीत-
- विश्व अजिंक्यपद स्पध्रेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाबाबत काय सांगाल?
भारतीय संघातील खेळाडू चांगल्या फॉर्मात आहेत. आर. एम. शंकरा आणि एस. अपूर्वा यांनी यापूर्वी ही स्पर्धा जिंकलेली आहे. आयसीएफ चषक या मानाच्या स्पर्धेचे जेतेपद रियाज अकबर अलीने पटकावले आहे. संदीप देवरुखकर हा राष्ट्रीय विजेता आहे. प्रशांत मोरे हा नवीन चेहरा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसत असला तरी चांगल्या कामगिरीमुळे गाजत आहे. महाराष्ट्राबरोबर राष्ट्रीय स्पर्धामध्ये त्याची कामगिरी लक्षणीय ठरली आहे. महिलांमध्ये काजल कुमारीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयसीएफ चषकाबरोबर राष्ट्रीय स्पर्धाही जिंकलेली आहे. आयसीएफ चषकात भारताची कामगिरी नेत्रदीपक झाली होती. त्यामुळे भारताकडून नक्कीच जेतेपदाची आशा करणे चुकीचे ठरणार नाही.
- भारताला कोणत्या देशांकडून कडवी लढत मिळेल?
भारताला श्रीलंकेकडून कडवी लढत मिळेल. गेल्या वर्षी श्रीलंकेच्या फर्नाडोने जेतेपद पटकावले होते. त्यामुळे त्याच्याकडून भारताच्या पुरुष संघाला चांगली झुंज मिळेल, असे वाटते. पण महिलांमध्ये भारताचा संघ सर्वात सरस आहे. त्यामुळे महिलांचे जेतेपद भारतामध्येच येईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
- या स्पध्रेसाठी कोणती खास तयारी भारतीय संघाने केली आहे?
भारतामध्ये किंवा आशियामध्ये बोरिक पावडर वापरली जाते. पण जेव्हा स्पर्धा युरोपियन देशांमध्ये होते, तेव्हा ‘पोटॅटो स्टार्च’पावडर वापरली जाते. या पावडरमुळे खेळ अधिक जलद होतो. तुम्ही मारलेला हळुवार फटकाही फार वेगाने जाऊ शकतो. त्यामुळे या पावडरवर खेळताना नियंत्रण असणे फार महत्त्वाचे असते. आम्ही सध्या दररोज सहा तास सराव करत आहोत आणि जवळपास महिन्याभरापासून ‘पोटॅटो स्टार्च’पावडरचा सरावासाठी वापर करत आहोत. यापूर्वी ही पावडर भारतामध्ये सरावासाठी कधी उपलब्ध झाली नव्हती, यावेळी पहिल्यांदाच आम्हाला या पावडरवर सराव करता आला आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळणे आम्हाला कठीण जाणार नाही.
- योगेश आणि रश्मी यांना या स्पध्रेसाठी थेट प्रवेश कशा प्रकारे मिळाला आहे?
या स्पर्धेत योगेश परदेशी आणि रश्मी कुमारी हे दोन मातब्बर खेळाडू भारतीय संघात नसले तरी त्यांना विश्व अजिंक्यपद स्पध्रेसाठी थेट प्रवेश देण्यात आला आहे. योगेश आणि रश्मी हे कॅरमपटू सर्वाच्याच परिचयाचे आहेत. आंतरराष्ट्रीय संघटनेने यावेळी पहिल्यांदाच दोन खेळाडूंना थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वेळी श्रीलंकेच्या खेळाडूने ही स्पर्धा जिंकली असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी पाहता हा निर्णय घेण्यात आला असावा. या दोन्ही खेळाडूंकडे आंतरराष्ट्रीय स्तराचा दांडगा अनुभव आहे. रश्मी कुमारी ही गतविजेती आहेच.
विश्व अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत भारताची कामगिरी
- नवी दिल्ली, १९९१ : भारतीय पुरुषांनी सांघिक जेतेपद पटकावले. पुरुष एकेरीमध्ये अनुक्रमे मारिया इरुदयाम, अरोकिया राज, राजू काटरे आणि महेंद्र तांबे यांनी अनुक्रमे १-४ क्रमांक पटकावले होते. त्याचबरोबर महिला एकेरीमध्ये अनुराजूने प्रथम आणि महाराष्ट्राच्या संगीता चांदोरकरने द्वितीय क्रमांक पटकावला. पुरुष दुहेरीमध्ये मारिया इरुदयाम आणि अरोकिया राज यांनी जेतेपद पटकावले.
- कोलंबो, १९९५ : सलग दुसऱ्यांदा भारताने पुरुष गटामध्ये सांघिक जेतेपद पटकावले. एकेरीच्या दोन्ही गटांमध्ये भारताने पहिले चार क्रमांक पटकावले. पुरुषांमध्ये मारिया इरुदयाम, अरोकिया राज, संजय मांडे आणि जदन बेंगळे यांनी अनुक्रमे १-४ क्रमांक पटकावले. महिलांमध्ये जी. रेवती, पी. निर्मला, डी. युवाराणी आणि संगीता चांदोरकर यांनी अनुक्रमे १-४ क्रमांक पटकावले. महिला दुहेरीमध्ये जी. रेवती आणि डी. युवाराणी यांनी जेतेपद मिळववले.
- नवी दिल्ली, २००० : भारताने सांघिक विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवली, तर पहिल्यांदाच महिला गटाचे सांघिक जेतेपद देण्यात आले आणि तेदेखील भारतानेच पटकावले. पुरुष एकेरीमध्ये पहिले चार आणि महिला एकेरीमध्ये पहिले पाच क्रमांक भारतानेच पटकावले. पुरुषांमध्ये आर. एम. शंकरा, योगेश परदेशी, एम. नटराज आणि मारिया इरुदयाम यांनी १-४ क्रमांक पटकावले. महिलांमध्ये रश्मीकुमारी, पी. निमाला, आर. शर्मिला, जी. रेवती, आणि पी. पोन्नारसी यांनी अनुक्रमे पहिले १-५ क्रमांक पटकावले. पुरुष दुहेरीमध्ये महाराष्ट्राच्या योगेश परदेशीने शंकरा यांच्यासाथीने जेतेपद पटकावले. महिला दुहेरीमध्ये आर. शर्मिला आणि पी. पोन्नारसी यांनी जेतेपद पटकावले.
- कोलंबो, २००४ : पुरुष आणि महिला या दोन्ही गटांचे सांघिक विजेतेपद भारतानाचे पटकावले. पुरुष आणि महिला एकेरीमध्ये पहिले चार क्रमांक पुन्हा एकदा भारतानेच पटकावले. पुरुष एकेरीमध्ये आर. एम. शंकरा, महाराष्ट्राचा संदीप देवरुखकर, डी कुबेंद्र बाबू आणि महाराष्ट्राचा दिलेश खेडेकर यांनी अनुक्रमे पहिले चार क्रमांक पटकावले. महिलांमध्ये एस. अपूर्वा, आर. निमाला, रश्मी कुमारी आणि के. सुवर्णा यांनी अनुक्रमे १-४ क्रमांक पटकावले. पुरुष दुहेरीमध्ये शंकरा आणि दिलेश यांनी जेतेपद पटकावले. महिला दुहेरीमध्ये एस. अपूर्वा आणि आर. निमाला यांनी जेतेपद मिळवले.
- कान्स, २००८ : भारताला धक्का देत श्रीलंकेने पुरुष गटातील सांघिक जेतेपद पटकावले, पण महिलांनी सांघिक जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली. पुरुषांच्या एकेरीमध्ये महाराष्ट्राच्या योगेश परदेशीने जेतेपदाला गवसणी घातली, तर त्यानंतरचे तिन्ही क्रमांक अनुक्रमे एम. नटराज, आर. एम. शंकरा, आर. अरोकिया राज यांनी पटकावले, महिला एकेरीमध्ये आय. इलाव्हाझाकी, पी. निमाला आणि रश्मी कुमारी यांनी बाजी मारली. पुरुष दुहेरीमध्ये शंकरा आणि नटराज यांनी जेतेपद पटकावले. महिला दुहेरीमध्ये रश्मी कुमारी आणि निमाला यांनी जेतेपद पटकावले.
- कोलंबो, २०१२ : भारताने पुरुष आणि महिला या दोन्ही गटांचे सांघिक जेतेपद पटकावले. पण श्रीलंकेच्या निशांता फर्नाडोने पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. महिलांमध्ये रश्मी कुमारी, आय. इलाव्हाझाकी, कविता सोमंची आणि एम. प्रीमलादेवी यांनी पहिले चार क्रमांक पटकावले. पुरुष दुहेरीमध्ये महाराष्ट्राच्या योगेश परदेशी आणि प्रकाश गायकवाड यांनी जेतेपद मिळवले. महिला दुहेरीमध्ये रश्मी कुमारी आणि आय. इलाव्हाझाकी यांनी जेतेपद पटकावले.