|| तुषार वैती

आठवडय़ाची मुलाखत : क्लॅरेन्स लोबो, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते हॉकी प्रशिक्षक

भारतीय हॉकी संघ पुन्हा चांगल्या तयारीत असून देशातच विश्वचषक होणार असल्याचा फायदा भारताला निश्चितपणे मिळेल. त्यामुळे यंदाच्या हॉकी विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारेल, असा विश्वास द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित हॉकी प्रशिक्षक क्लॅरेन्स लोबो यांनी व्यक्त केला.

जवळपास २५ वर्षांच्या हॉकी प्रशिक्षणानंतर मुंबईच्या लोबो यांनी सरदार सिंग, संदीप सिंग, पी. आर. श्रीजेश यांच्यासारखे अनमोल तारे देशाला दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हॉकी प्रशिक्षक लोबो यांना द्रोणाचार्य पुरस्काराने (जीवनगौरव प्रकार) गौरविण्यात आले. मित्र, मोठा भाऊ आणि वडिलकीच्या नात्याने प्रशिक्षकाने खेळाडूची जडणघडण करावी, या तत्त्वाचा अवलंब करणाऱ्या लोबो यांनी अनेक चांगले खेळाडू घडविण्याची किमया करून दाखवली आहे. त्यांच्या कारकीर्दीविषयी केलेली ही बातचीत-

  • भुवनेश्वरला होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून कितपत अपेक्षा बाळगता येतील?

यंदाच्या विश्वचषकासाठी भारतीय संघाची तयारी चांगली झाली आहे. त्यातच भारताच्या ‘क’ गटात दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि बेल्जियमचा समावेश असल्यामुळे भारताला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याची चांगली संधी आहे. मात्र उपांत्य फेरीत काहीही घडू शकते. ऑस्ट्रेलिया, जर्मनी संघ समोर असल्यामुळे खेळाडू दडपणाखाली येऊ  शकतात. घरच्या वातावरणात भारतीय चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खेळाडूंना मिळण्याचाही फायदा होऊ शकतो.

  • कर्णधारपद युवा मनजित सिंगकडे सोपवण्याची रणनीती भारतासाठी कितपत फायदेशीर ठरेल?

भारतात प्रशिक्षकच महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतो. संघात कुणाला कधी खेळवायचे, कोणत्या ठिकाणी खेळवायचे, कुणाकडून चुका होत असतील तर त्या कशा सुधारायच्या, हे सर्व निर्णय प्रशिक्षक घेत असतो. कर्णधार फक्त मैदानावर खेळत असताना काही निर्णय घेत असतो. त्यामुळे कर्णधारपद कोणाकडेही सोपवले तरी त्याचा संघाच्या कामगिरीवर फारसा फरक पडणार नाही, असे मला वाटते.

  • आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्याने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याची संधी गमवावी लागली. भारताकडून नेमक्या काय चुका घडल्या?

कधी-कधी एक सामना असा असतो की तो दिवस आपला नसतो. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करूनही सगळ्यावर पाणी फेरले जाते. पण यापुढेही भारतीय संघाला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी आणखी संधी मिळणार आहेत. सध्याचा भारतीय संघ सक्षम असल्यामुळे भारत नक्कीच टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळेल, असा विश्वास आहे.

  • परदेशी प्रशिक्षकांचा भारताला आतापर्यंत कितपत फायदा झाला?

मायकेल नॉब्स, रिक चाल्सवर्थ, होजे ब्रासा, रोएलंट ओल्टमन्स यांच्यासारखे चांगले प्रशिक्षक भारताला लाभले. प्रत्येक प्रशिक्षक आपल्याकडून खेळाडूंना नवनवीन गोष्टी शिकवत असतात. पूर्वी भारतीय संघाची खेळण्याची पद्धत संथ गतीची होती. कौशल्यपूर्ण खेळ आपण करायचो. पण या परदेशी प्रशिक्षकांमुळे भारताच्या खेळात कौशल्याबरोबरच वेगाची सांगड जोडली गेली आहे. भारतीय हॉकीसाठी ही चांगली गोष्ट आहे.

  • भारताचे सध्याचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्याविषयी काय सांगाल?

हरेंद्र सिंग यांची आकलन क्षमता जबरदस्त आहे. हॉकी तंत्रात फारसा बदल न करता त्यांनी खेळाडूंचा वेग आणि तंदुरुस्ती वाढवली आहे, संघात शिस्त आणली आहे. खेळाडूंवर कधी दडपण टाकायचे आणि त्यांच्याकडून सर्वोत्तम खेळ कसा करवून घ्यायचा, यात ते निष्णात आहेत.

  • एकेकाळी भारतीय संघात अनेक खेळाडू मुंबईचे असायचे. पण ही परिस्थिती बदलली आहे. मुंबईतून खेळाडू घडविण्याच्या प्रक्रियेत मधल्या काळात कसा खंड पडला ?

मुंबई, महाराष्ट्रातील स्पर्धाची संख्या फारच कमी झाली आहे. ती सर्वप्रथम वाढायला हवी. महाविद्यालयीन आणि विद्यपीठाच्या स्तरावरही स्पर्धा व्हायला हव्यात. तरच खेळाडू हॉकीशी पुढेही जोडले जातील. त्याचबरोबर मुंबईत सध्या तीनच अ‍ॅस्ट्रोटर्फ मैदाने आहेत. त्याची संख्याही पाच-सहापर्यंत वाढवायला हवी. माती किंवा गवतावर सराव करून चालणार नाही. चांगले खेळाडू घडविण्यासाठी अ‍ॅस्ट्रोटर्फचीच आवश्यकता आहे. मोठय़ा संख्येने खेळाडू सराव करू लागले तर त्यातूनच गुणी खेळाडू देशाला मिळतील.