|| ऋषिकेश बामणे

आठवडय़ाची मुलाखत : महेश पालांडे, महाराष्ट्राचे प्रशिक्षक

महाराष्ट्राच्या मुलींनी सलग सातवे विजेतेपद मिळवल्याचा आनंद आहेच, मात्र यासाठी त्यांनी केलेल्या मेहनतीला कोणीही कमी लेखू नये. तसेच महिलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणखी व्यावसायिक संधी उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा महाराष्ट्राच्या मुलींच्या खो-खो संघाचे प्रशिक्षक महेश पालांडे यांनी व्यक्त केली.

जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पालांडे यांच्या प्रशिक्षणाखाली महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने भारतीय विमानतळ प्राधिकरण संघावर १३-१२ अशी सरशी साधून सलग सातव्या राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. मुलींच्या कामगिरीबाबत आणि खो-खो पुढील आगामी आव्हानांच्या दृष्टीने महेश यांच्याशी केलेली ही खास बातचीत –

  • राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव शिबिरात खेळाडूंना कशा प्रकारे प्रशिक्षण देण्यात आले?

सर्वप्रथम गतविजेते असल्याने दमदार कामगिरी करण्याचे दडपण होतेच, मात्र यामुळे खेळाडूंवर अतिरिक्त ताणही पडणार नाही, याची आम्ही काळजी घेतली. जयपूर येथे ज्या वेळी आम्ही पोहोचलो तेव्हा सर्वच जण आम्हाला यंदा विमानतळ संघ यशस्वी होईल, त्यांच्यापासून सावध राहा, असा इशारा देत होते. मात्र मला माझ्या संघातील खेळाडूंवर पूर्ण भरवसा होता. त्याशिवाय सांगली येथे झालेल्या शिबिराचा मला संघबांधणीसाठी फार उपयोग झाला. प्रत्येक खेळाडू महाराष्ट्रातीलच असला तरी त्या विविध जिल्ह्य़ातून आल्यामुळे त्यांची खो-खोची भाषा वेगळी होती. शिबिरात आम्ही खेळाडूंना मुख्यत्वे एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ कसा घालवता येईल, यावर भर दिला. प्रियंका इंगळे व पूजा फरगडे यांच्यामुळे आक्रमणाची बाजू बळकट झाली, परंतु संरक्षणावर अधिक लक्ष द्यावे लागले.

  • महाराष्ट्र वगळता इतर संघांच्या प्रगतीविषयी तुमचे काय मत आहे?

महाराष्ट्राला रेल्वे, विमानतळ प्राधिकरण संघाकडून नेहमीच कडवे आव्हान मिळाले आहे. मात्र यंदा हरयाणा, केरळ, कर्नाटक यांनीदेखील उल्लेखनीय कामगिरी करून स्वत:च्या नावाची दखल घेण्यास भाग पाडले. मुख्य म्हणजे हरयाणाच्या संघातील मुलींची शरीरयष्टी व तंदुरुस्तीची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. या संघांनी आपापल्या रीतीने स्वत:च्या वेगळ्या शैली निर्माण केल्या आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात या संघांनी महाराष्ट्राला विजयासाठी संघर्ष करायला लावल्यास कोणालाही आश्चर्य वाटणार नाही.

  • आगामी आव्हानांसाठी तुम्ही कशा प्रकारे तयारी करत आहात?

सांगलीतील शिबिरात खेळाडू आहाराकडे (डाएट) फार दुर्लक्ष करत आहेत, ही बाब मला लक्षात आली. पहिल्यांदाच राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षण करत असल्यामुळे खेळाडूंना संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देण्याचा मी त्यावेळी प्रयत्न केला. अधिकाधिक व्यावसायिक खेळाडू घडवायचे असल्यास आपल्याला अशा लहानसहान गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण कौशल्यात महाराष्ट्राचे खेळाडू नक्कीच इतरांहून सरस आहेत. परंतु खो देण्याचा प्रकार, खुंट मारणे यांसारख्या गोष्टींमध्ये इतर संघही महाराष्ट्रासह समपातळीवर आहेत. त्यामुळे या जून महिन्यापर्यंतच्या विश्रांतीच्या काळात माझे खेळाडूंना आहारासंबंधी मार्गदर्शन देण्याकडे कल राहिल.

  • खो-खोमध्ये युवा पिढीच्या व विशेषत: महिलांच्या भवितव्याविषयी तुमचे काय मत आहे?

माझ्या मते खो-खोमध्ये महिलांना नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे. शीतल भोर, पौर्णिमा सकपाळ, सारिका काळे, मीनल भोईर यांसारख्या खेळाडू याचे उत्तम उदाहरण आहेत. मात्र महिलांना स्वत:चे कौशल्य दाखवण्यासाठी पुरेशा व्यावसायिक संधी मिळत नाहीत, किंबहुना त्यांच्या कामगिरीकडे तितक्या गांभीर्याने पाहिले जात नाही, असे मला वाटते. त्याशिवाय मुलींच्या कामगिरीला त्यांच्या घरातल्यांकडूनही तितका पाठिंबा मिळाल्यास वयाच्या २८-३० किंवा लग्न झाल्यानंतरही त्या खो-खो खेळ खेळू शकतील.

  • खो-खोच्या प्रसारासाठी काय उपाय सुचवाल?

शालेय स्तरांवर नियमितपणे खो-खो स्पर्धाचे आयोजन केल्यास महाराष्ट्राला अधिक गुणवान खेळाडू मिळतील. अ‍ॅथलेटिक्स, फुटबॉल यांसारख्या खेळात १४ वर्षांखालील मुलांसाठीही स्पर्धा भरवण्यात येतात, तसेच खो-खोमध्येही लवकरच होईल, अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय प्रो खो-खो लीग खेळाच्या प्रसारात मोठी भूमिका बजावेल, असे मला वाटते. याचप्रमाणे सीबीएसई शाळांमध्येही खो-खोचे प्रशिक्षण सुरू करावे, अशी माझी इच्छा आहे.