भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पध्र्याच्या सामन्यांना जगभरात कुठेही गर्दी होते, या देशांमध्ये जर हा सामना होत असेल तर तिकिटांसाठी चाहते कितीही पैसे मोजायला तयार असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना २५ डिसेंबरला चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असून त्यासाठी शुक्रवारी तिकिट विक्रीला सुरूवात करण्यात आली. पहिल्या दिवशी तिकिटांना उदंड प्रतिसाद लाभला. २००७नंतर या दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवण्यात येत असल्याने तिकिट विक्रीला कमालीचा जोर आहे. लोकांनी गुरुवारी रात्रीपासूनच तिकिट विक्रीसाठी रांगा लावल्या आहेत, असे येथील पोलिसांनी सांगितले.    
सामन्यांच्या तिकिटांसंदर्भात बीसीसीआयचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान यांच्यातील मर्यादित षटकांच्या सामन्यांची तीन हजार तिकिटे अद्याप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) पोहोचली नसल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. त्यासंदर्भात बीसीसीआयने पत्रकाद्वारे स्पष्ट केले की, आता पीसीबीला कमी तिकिटांची आवश्यकता आहे. बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई आणि कोलकाता या सामन्यांच्या प्रत्येकी ५०० याचप्रमाणे दिल्लीच्या सामन्याची १००० तिकिटे पीसीबीला हवी होती. परंतु नंतर पीसीबीने बंगळुरू आणि अहमदाबादच्या सामन्यांती कोणतीही तिकिटे नको असल्याचे स्पष्ट केले. याचप्रमाणे चेन्नई आणि कोलकात्याच्या सामन्याच्या प्रत्येकी २५ तिकिटांची मागणी केली आहे.