scorecardresearch

माद्रिद मास्टर्स बॅडिमटन स्पर्धा : सिंधू हंगामातील पहिल्या अंतिम फेरीत, सिंगापूरच्या येओ जिया मिनवर संघर्षपूर्ण विजय

माद्रिद मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेत सिंधूने शनिवारी सिंगापूरच्या येओ जिया मिनचे आव्हान २४-२२, २२-२० असे मोडून काढले.

PV Sindhu
पी व्ही सिंधू (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

माद्रिद : भारताच्या पी व्ही सिंधूने अपयशाच्या मालिकेतून बाहेर पडताना यंदाच्या हंगामातील पहिल्या अंतिम फेरीत प्रवेश केला. माद्रिद मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेत सिंधूने शनिवारी सिंगापूरच्या येओ जिया मिनचे आव्हान २४-२२, २२-२० असे मोडून काढले.

उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत विजयाचे पारडे सातत्याने झुकताना दिसत होते. अनोळखी खेळाडूंविरुद्धची सिंधूची अपयशी मालिका कायम राहणार का अशी भीती एक वेळ दिसत असतानाच लौकिकाला साजेसा खेळ करत सिंधूने ४९ मिनिटांच्या लढतीनंतर जियाचे आव्हान परतवून लावले.

बरोबरीत चाललेला गेम हेच या लढतीचे वैशिष्टय़ ठरले. पहिल्या गेमला १-१, २-२ ही बरोबरीची मालिका प्रथम जियाने खंडित करताना १४-१० अशी आघाडी घेतली. त्यानंतर संयमाने खेळत जियाने २०-१५ अशी निर्णायक आघाडी घेतली. कमालीच्या निर्धाराने खेळणाऱ्या सिंधूने याच क्षणी सलग पाच गुणांची कमाई करत २०-२० अशी बरोबरी साधली आणि त्यानंतर गेम २२-२२ अशा बरोबरीवर येऊन थांबला. तेव्हा सिंधूने सलग दोन गुण घेत पहिला गेम जिंकला. या गेममध्ये जियाला सात गेम पॉइंटचा फायदा उठवता आला नाही.

दुसऱ्या गेममध्ये सिंधूने काहीशी सकारात्मक सुरुवात करताना ४-४ अशा बरोबरीनंतरच सलग चार गुण घेत ८-४ अशी आघाडी मिळवली. सिंधूने नियंत्रित खेळ करताना १४-११ अशी आघाडी वाढवली. मात्र, जिद्दी जियाने बरोबरी साधताना सिंधूसमोर पुन्हा एकदा कडवे आव्हान उभे केले. जियाने १७-१४ अशा पिछाडीनंतर सलग चार गुण घेत गेमध्ये १७-१८ अशी आघाडी मिळवली. मात्र, सिंधूने अनुभवाला साजेसा खेळ दाखवताना तीन गेम पॉइंटनंतर दुसरा गेम जिंकताना विजयावर शिक्कामोर्तब केले. विजेतेपदासाठी सिंधूची गाठ आता अग्रमानांकित कॅरोलिना मारिन आणि ग्रेगोरिया मरिस्का तुनजुंग यांच्यातील विजेतीशी पडणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 03:34 IST

संबंधित बातम्या