सिन्नरच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेतील फक्त चौघांना स्थान

भारतीय रेल्वेच्या सिद्धार्थ देसाई खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या संघात प्रो कबड्डी लीग गाजवणाऱ्या ताऱ्यांचे अष्टक चमकत आहेत. मात्र सिन्नरच्या राज्य अजिंक्य कबड्डी स्पर्र्धेतून फक्त चौघांना स्थान मिळाल्यामुळे महाराष्ट्राच्या कबड्डी वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

महाराष्ट्राच्या १२ जणांच्या संघात गिरीश इर्नाक (ठाणे), निलेश साळुंखे (ठाणे), विशाल माने (मुंबई), रिशांक देवाडिगा (उपनगर), तुषार पाटील (कोल्हापूर), विकास काळे (पुणे), अजिंक्य पवार (रत्नागिरी), सचिन शिंगार्डे (सांगली) अशा आठ प्रो कबड्डीमधील खेळाडूंचा भरणा आहे. मात्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेद्वारे फक्त आमिर धुमाळ, संकेत बानकर (रायगड), अभिषेक भोजने (रत्नागिरी), सुनील दुबिले (पुणे) अशा चारच खेळाडूंची निवड झालेली आहे. सिन्नरच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या रायगडच्या दोन्ही खेळाडूंनी स्थान मिळवले आहे. उपांत्य फेरीमध्ये पराभूत झालेल्या रत्नागिरीच्या एकाने स्थान मिळवले आहे. परंतु उपविजेत्या सांगली आणि उपांत्य फेरीतील पराभूत मुंबईचा एकही राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील खेळाडू महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवू शकलेला नाही.

गतवर्षी आपल्या भक्कम बचावामुळे महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गिरीश इर्नाककडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर कोल्हापूरच्या तुषार पाटीलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मागील वर्षीच्या राष्ट्रीय विजेत्या संघातील ऋतुराज कोरवीला महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. त्याने यंदाच्या प्रो कबड्डीमध्ये गुजरात फॉच्र्युनजायंट्सकडून खेळताना २३ सामन्यांत ४७ गुण मिळवले होते.

महाराष्ट्राचा संघ

कर्णधार गिरीश इर्नाक, उपकर्णधार तुषार पाटील (कोल्हापूर), निलेश साळुंखे (ठाणे), विशाल माने (मुंबई), रिशांक देवाडिगा (उपनगर), आमिर धुमाळ, संकेत बानकर (रायगड), अभिषेक भोजने, अजिंक्य पवार (रत्नागिरी), विकास काळे, सुनील दुबिले (पुणे), सचिन शिंगार्डे (सांगली). प्रशिक्षक : प्रताप शिंदे, व्यवस्थापक : मनोज पाटील.

गतविजेत्या संघातील निम्मेच खेळाडू

मागील वर्षी तब्बल ११ वर्षांनी राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या महाराष्ट्राच्या संघातील निम्मेच खेळाडू आपले स्थान टिकवण्यात यशस्वी ठरले आहेत. सिद्धार्थ देसाई, विराज लांडगे, नितीन मदने, ऋतुराज कोरवी, अजिंक्य कापरे आणि रवी ढगे यांना आपले स्थान टिकवण्यात अपयश आले आहे. यापैकी सिद्धार्थ, नितीन आणि ऋतुराज यांना महाराष्ट्राच्या प्राथमिक (३०) संघात समाविष्ट करण्यात आले होते.

सिद्धार्थची उणीव भासू देणार नाही! – प्रशिक्षक प्रताप शिंदे यांना विश्वास

तांत्रिक अडचणीमुळे सिद्धार्थ देसाई अखेरच्या क्षणी महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवू शकला नाही. परंतु आता आम्ही तशी मानसिकता तयार केली आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील महाराष्ट्राच्या वाटचालीत त्याची उणीव आम्ही भासू देणार नाही, असा विश्वास महाराष्ट्राचे प्रशिक्षक प्रताप शिंदे यांनी व्यक्त केला.

‘‘दडपण झुगारण्याचे तंत्र मी महाराष्ट्राच्या खेळाडूंना शिकवले आहे. बचाव ही आमची जमेची बाजू आहे. गटातील सर्व सामने जिंकून गटविजेत्याच्या थाटातच बाद फेरीत जाण्याचे पहिले लक्ष्य असेल,’’ असे शिंदे यांनी सांगितले.

सराव शिबिरातील आव्हानांविषयी शिंदे म्हणाले, ‘‘दुखापती हे महत्त्वाचे आव्हान विशेष सराव शिबिरात होते. प्रो कबड्डीच्या प्रदिर्घ हंगामामुळे दुखापतींची महाराष्ट्रासह सर्वच संघांना चिंता असेल. त्यामुळे प्रो कबड्डीचा हंगाम कमी करावा आणि राष्ट्रीय स्पर्धेपासून त्यात तीन-चार महिन्यांचे अंतर ठेवावे. त्यामुळे खेळाडू प्रो कबड्डी आणि राज्यासाठीसुद्धा उत्तम कामगिरी करू शकतील.’’

शक्तीपेक्षा युक्तीचीच रणनीती आखू! – कर्णधार गिरीश इर्नाकचा निर्धार

आगामी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सेनादल, रेल्वे, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या बलवान संघांचे कडवे आव्हान गतविजेत्या महाराष्ट्रापुढे असेल. मात्र त्यांच्याविरुद्ध खेळताना शक्तीपेक्षा युक्तीचीच रणनीती आम्ही आखणार आहोत. त्यामुळे दिमाखदार कामगिरी करून विजेतेपद टिकवू, असा निर्धार महाराष्ट्राचा कर्णधार गिरीश इर्नाकने व्यक्त केला.

घरच्या मैदानावरील स्पर्धेचे दडपण कितपत असेल, या प्रश्नाला उत्तर देताना गिरीश म्हणाला, ‘‘राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्रात होत असल्यामुळे दडपण आमच्यावर आहेच. प्रेक्षकांची साथ आणि त्यांच्या अपेक्षांच्या पूर्तीचे आव्हानसुद्धा आमच्यावर असेल. प्रो कबड्डीमधील खेळाडू प्रत्येक संघातून खेळत आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांचे आव्हान तितकेच ताकदीचे असेल.’’

नागोठणे येथे झालेल्या महाराष्ट्राच्या विशेष सराव शिबिराविषयी गिरीश म्हणाला, ‘‘या  शिबिरात प्रशिक्षक प्रताप शिंदे यांनी आमचे मनोधैर्य उंचावले आहे. संग्राम मांजरेकर यांनी तंदुरुस्तीचे धडेसुद्धा आम्हाला दिले आहेत. याशिवाय राजू भावसार, अशोक शिंदे यांच्यासारख्या अनेक मातब्बर प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले. सामन्याच्या स्थितीनुसार सरावसुद्धा अप्रतिम झाला आहे.’’

हा संघ महाराष्ट्राचा संघ नसून, प्रो कबड्डीचा आहे. जो खेळाडू जिल्हा संघातून राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळलाच नाही, त्याला निवड समिती घेतेच कसे? या खेळाडूंना खेळवण्याची नवी प्रथा आता सुरू झाली आहे. या पद्धतीने जर संघाची निवड होत असेल, तर महाराष्ट्राच्या अधोगतीला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे यापुढे राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धाच घेऊ नये.   – दत्ता पाथ्रीकर, औरंगाबाद कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष

राज्य अजिंक्यपद आणि छत्रपती शिवाजी करंडक स्पर्धा गाजवणाऱ्या पंकज मोहितेवर अन्याय झाला आहे. पंकजसारख्या चढाईपटूची संघाला नितांत गरज होती. मात्र राज्य निवड चाचणी संदर्भातील निवड समितीचे नेमके निकष काय आहेत, हेच समजत नाही.   – संजय सूर्यवंशी, मुंबईचे प्रशिक्षक

राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. परंतु या संघातून खेळणाऱ्या एकाही खेळाडूला राज्याच्या संघात स्थान न मिळणे, हे निराशाजनक आहे.   – राजेश पाडावे, प्रशिक्षक

भारतीय कबड्डी संघटनेची निवडणूक १५ फेब्रुवारीला

भारतीय हौशी कबड्डी महासंघाची निवडणूक येत्या १५ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता नवी दिल्लीमधील हॉटेल ईरॉस येथे होणार आहे, अशी माहिती भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे प्रशासक निवृत्त न्यायमूर्ती एस. पी. गर्ग यांनी सर्व राज्य संघटनांना पत्र पाठवून दिली आहे.

गेल्या वर्षी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भारतीय कबड्डी संघटनेवरील जनार्दनसिंह गेहलोत कुटुंबीयांची मक्तेदारी संपुष्टात आली होती. त्यानंतर संघटनेचा कारभार आणि पुढील निवडणूक प्रक्रीया राबवण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासक गर्ग यांच्याच निर्देशानुसार पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी ही निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

सिद्धार्थसाठी रेल्वेचे दरवाजेसुद्धा बंद

विशेष सराव शिबिराला गैरहजर राहिल्यानंतर राजीनाम्याची प्रक्रिया चालू असलेल्या सिद्धार्थ देसाईला भारतीय रेल्वेने संघात स्थान दिलेले नाही. कर्णधार डी. चेरलाथनच्या नेतृत्वाखालील १२ सदस्यीय संघावर रेल्वेने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. यात महाराष्ट्राच्या श्रीकांत जाधवने स्थान मिळवले आहे. याशिवाय संजीव कुमार यांच्यासह राणाप्रताप तिवारी यांच्याकडे संघाच्या मार्गदर्शनाची जबाबदारी असेल.

भारतीय रेल्वेचा संघ

कर्णधार डी. चेरलाथन, रवींद्र पहेल, संदीप धूल, परवेश भन्सवाल, सुनील कुमार, रवी कुमार, पवन शेरावत, श्रीकांत जाधव, दीपक नरवाल, विकास खंडोला, के. सेल्व्हामणी, रोहित गुलिया; प्रशिक्षक : संजीव कुमार आणि राणाप्रताप तिवारी, व्यवस्थापक : मंदार शेट्टी.