महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा आहे, तिचा सन्मानही करायला हवा, जिंकलेल्या मल्लाचे अभिनंदन करायलाच हवे; पण ती राज्यस्तरीय स्पर्धा झाली. त्याच्या पुढे काय, याचा विचारच होत नाही. जे मल्ल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर जातात, त्यांना अधिक सांभाळले गेले पाहिजे. महाराष्ट्र केसरी म्हणजे तो त्याच्या गटातले जेतेपद पटकावतो; पण त्याला फार मोठे महत्त्व दिले जाते. फार मोठा देखावा केला जातो. पालकही हाच विचार करतात की, आपला मुलगा महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे. या स्पर्धेचे महत्त्व कमी करण्याची गरज नाही, पण या पालकांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तराचे महत्त्व पटवून द्यायला हवे. पालक, संघटक, शासन यांनी ‘महाराष्ट्र केसरी’च्या पलीकडे कुस्तीचे जग आहे, याचा विचार केला तरच महाराष्ट्रात अधिक आंतरराष्ट्रीय मल्ल तयार होतील आणि महाराष्ट्रातील मल्ल पुन्हा एकदा ऑलिम्पिक पदक मिळवू शकेल, गतवैभव पुन्हा एकदा आपण मिळवू शकू, असे स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवारेने व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा दबदबा पाहायला मिळत नाही. उलटपक्षी महाराष्ट्रांच्या मल्लांवर अन्यायच होतो, याबाबतचे कारण विचारल्यावर राहुल म्हणाला की, ‘‘खाशाबा जाधवांनी भारताला पहिले ऑलिम्पिद पदक मिळवून दिले, ते कुस्तीतले. १९५२ पासून १९७२ पर्यंत महाराष्ट्राच्या मल्लांचा दबदबा होता. त्यानंतर मात्र हे चित्र बदलले. त्यानंतर संघटनांवर
दिल्ली-हरयाणातल्या संघटकांचा शिरकाव झाला. त्यांनी त्यांचे स्थान प्रबळ केले आणि महाराष्ट्राच्या संघटकांची पीछेहाट झाली. त्यांच्या कुस्तीपटूंची संख्या वाढली, त्यांना व्यासपीठही मिळायला लागले आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेपर्यंत आपण मर्यादित राहिलो.’’
संघटकांनी पाठीशी उभे राहायला हवे
महाराष्ट्राचे मल्ल आंतरराष्म्ट्रीत स्तरावर जास्त दिसत नाहीत. त्यामध्ये मल्लांची चूक नाही. यामध्ये पालक, संघटक, उस्ताद, सरकार यांनी या गोष्टीचा विचार करायला हवा. महाराष्ट्र सरकारने जर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जेतेपद पटकावल्यावर किती इनाम देणार हे ठरवले, तर अधिक मल्ल आकर्षित होतील. ही गोष्ट हरयाणामध्ये होत आहे. संघटनांनी खेळाडूंच्या पाठीशी उभे राहायला हवे, पण तसे होत नाही, याचा मला चांगला अनुभव आहे. मल्लांना महाराष्ट्र केसरीमध्येच बांधून ठेवले आहे. संघटकांनी त्यांना बाहेर काढायला हवे.
हरयाणा पोलिसांकडून नोकरीचा प्रस्ताव
महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे फार कमी खेळाडू आहेत, पण सर्वाना नोकरी नाही. हरयाणामध्ये तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यापूर्वीच नोकरी दिली जाते. २००९ साली राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना हरयाणा पोलिसांनी नोकरी देण्याचे ठरवले होते. ते एवढा पुढचा विचार करतात, पण महाराष्ट्रामध्ये असा विचार कधी होणार? सुशीलकुमारही माझ्या मागे लागला होता, पण मी महाराष्ट्र सोडणार नसल्याचे त्यांना सांगितले. हरिशचंद्र बिराजदार यांनी मला घडवले, प्रशिक्षणासह संस्कार दिले. त्यांना सोडून कसे जाणार, हा माझ्यासाठी मोठा प्रश्न होता.
कार्यपद्धतीतील दोषामुळे सुवर्णपदकापासून वंचित
राष्ट्रीय स्पर्धेत आपल्याला किती वर्षांनी सुवर्णपदक मिळते, याचा विचारही करायला हवा. महाराष्ट्रात गुणवत्ता कमी नाही, महाराष्ट्रासारखी गुणवत्ता देशात कुठेच नाही. हा सारा कार्यपद्धतीचा दोष. महाराष्ट्रातला माणूस अशिक्षित नाही. त्याला पाठबळाची, मार्गदर्शनाची गरज आहे.
..तर महाराष्ट्राचा गौरव वाढेल
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वर्षांतून एकदा होते. आता विजय चौगुलेला मुख्यमंत्र्यांनी नोकरी दिली. ही स्वागतार्ह बाब आहे; पण जे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत, त्यांचा विचारही केला जावा. नक्की कोणता मल्ल मोठा? हा विचारही करायला हवा. विजयने महाराष्ट्राचा गौरव वाढवला, असे मुख्यमंत्री म्हणाले; पण ही स्पर्धा तर राज्यस्तरीय होती, मग त्याने महाराष्ट्राचा गौरव कसा वाढवला? जर एखाद्या मल्लाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये नेत्रदीपक कामगिरी केली, तर त्याने महाराष्ट्राचा गौरव वाढवला, असे आपण म्हणू शकतो.
पैशांची कुस्ती बंद करायला हवी
महाराष्ट्रात पैशांची कुस्ती पूर्वापार सुरू आहे. पूर्वी दहा हजार रुपयांसाठी कुस्ती खेळवली जायची. जो जिंकायचा त्याला ८० टक्के आणि जो पराभूत व्हायचा त्याला २० टक्के रक्कम दिली जायची. आता ५० हजार रुपयांची कुस्ती लावली जाते आणि दोन्ही मल्लांना प्रत्येकी २५ हजार रुपये दिले जातात. त्यामुळे मल्लांकडे जिंकण्याची ईर्षां कुठून येणार. जर ही ईर्षां इथेच संपली तर हे मल्ल मोठय़ा स्तरावर कसे पोहोचणार, याचा विचार व्हायला हवा.