scorecardresearch

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : खो-खो संघांची सुवर्णकमाई ; महाराष्ट्राच्या अवंतिका, तेजस शिर्से, संयुक्ता काळे यांचेही सोनेरी यश

खो-खो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या महिला संघाने ओडिशा संघावर डावाने १८-८ असा एक डाव व १० गुणांनी सहज विजय मिळवला

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : खो-खो संघांची सुवर्णकमाई ; महाराष्ट्राच्या अवंतिका, तेजस शिर्से, संयुक्ता काळे यांचेही सोनेरी यश
महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला खो-खो संघांनी मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

अहमदाबाद : महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला खो-खो संघांनी मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जलतरणात अवंतिकाने ५० मीटर फ्री-स्टाईल प्रकारात राष्ट्रीय विक्रमासह सोनेरी यश मिळविले. तेजस शिर्सेने अडथळा शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. जिम्नॅस्टिकमध्येही संयुक्ता काळेने सुवर्णयश संपादन केले. हॉकी, तलवारबाजी आणि बॅडिमटन प्रकारातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपले आव्हान कायम राखले.

खो-खो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या महिला संघाने ओडिशा संघावर डावाने १८-८ असा एक डाव व १० गुणांनी सहज विजय मिळवला. प्रियांका भोपीची अष्टपैलू कामगिरी निर्णायक ठरली. तिला प्रियंका इंगळे, रुपाली बडे, रेश्मा राठोड यांची उत्तम साथ मिळाली.

पुरुष विभागात महाराष्ट्राने केरळचे आव्हान ३०-२६ असे सात मिनिटे राखून व ४ गुणांनी परतवून लावले. हृषिकेश मुर्चावडे, रामजी कश्यप, अक्षय भांगरे या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

जलतरणात अवंतिका चव्हाणने ५० मीटर फ्री-स्टाईल शर्यतीत विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. अवंतिकाने २६.५४ सेकंद वेळ देताना प्राथमिक फेरीत माना पटेलने नोंदवलेला २६.६० सेकंदांचा विक्रम मोडीत काढला.

अ‍ॅथलेटिक्समध्ये औरंगाबादचा राष्ट्रीय विक्रमवीर तेजस शिर्सेने पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीमध्ये १३.८४ सेकंद वेळ देत सुवर्णपदक जिंकले. कोमल जगदाळेने तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत १० मिनिटे ०.२२ सेकंद अशा वेळेसह रौप्यपदक मिळविले.

हॉकीत पुरुष संघाने हरयाणाचा ३-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्क्वॉश प्रकारात महिला संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने तालबद्ध प्रकारात १०१.६५ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राचीच रिचा चोरडिया ९९.१५ गुणांसह रौप्यपदकाची मानकरी ठरली.

संजीवनीचे सुवर्णपदक हुकले!

महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने सोमवारी १० हजार मीटर धावण्याची शर्यत जिंकली होती. मात्र, धावताना एकदा संजीवनीचा पाय दुसऱ्या रेषेमध्ये गेल्याने तिला अपात्र ठरवले होते. महाराष्ट्राने या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र, मंगळवारी तांत्रिक समितीने संजीवनीबाबतचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे तिचे सुवर्णपदक हुकले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या