धोनीच्या ‘माही रेसिंग  टीम इंडिया’चे अनावरण
भारताला २०११चा विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळातही उंच भरारी घेत आहे. वेग आणि मोटारबाइकचा दर्दी चाहता असलेल्या धोनीने काही महिन्यांपूर्वी मोटारबाइक क्षेत्रात दमदार पाऊल टाकल्यानंतर बुधवारी धोनीच्या नव्या ‘माही रेसिंग टीम इंडिया’चे सादरीकरण करण्यात आले. जागतिक सुपरबाइक चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या धोनीच्या या संघाने पुढील मोसमासाठी आपली रणनीती सादर करतानाच आपल्या ड्रायव्हर्सची घोषणाही केली.
‘‘भारतात मोटारबाइक हे केवळ दळणवळणाचे साधन नाही तर ती आवडही आहे. लहानपणी मी लोकांना बाइकवरून येताना-जाताना पाहायचो. तेव्हापासूनच माझी मोटारबाइकबद्दलची आवड वाढत गेली. देशात गेल्या १० वर्षांत मोटारबाइकने उत्तुंग भरारी घेतली. १०० सीसीवरून आता २२० सीसीपर्यंत बाइक उपलब्ध आहेत. त्यामुळेच वेगाच्या या खेळाकडे मी आकर्षित झालो,’’ असे धोनीने सांगितले. भारतात मोटारबाइक स्कूल स्थापन करण्याचा विचार असल्याचेही धोनीने सांगितले. तो म्हणतो, ‘‘नुकतीच मी मोटारबाइक क्षेत्रात उडी घेतली आहे. भारतात मोटारबाइक खेळाचे भवितव्य उज्ज्वल आहे. म्हणूनच येत्या काही वर्षांत येथे मी मोटारबाइक स्कूल स्थापन करणार आहे.’’ यावेळी माही रेसिंग टीम इंडिया संघाचा संचालक तसेच अभिनेता नागार्जुन, सहव्यवस्थापकीय संचालक नंदीश डोमलूर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahi racing team
First published on: 08-11-2012 at 04:43 IST