राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारे मनीष कौशिक (६० किलो) आणि सतीश कुमार (९१ किलोवरील) यांच्यासह सहा भारतीय बॉक्सर्सनी इराण येथे सुरू असलेल्या माकरान चषक बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतींमध्ये दीपक सिंग (४९ किलो), पी. ललिता प्रसाद (५२ किलो), संजीत (९१ किलो) आणि दुर्योधन सिंग नेगी (६९ किलो) यांनीही आपापल्या लढती जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

राष्ट्रीय विजेत्या कौशिकने अश्कान रेझाई याचा ४-१ असा पराभव केला. त्याला विजेतेपदासाठी डॅनियल बक्ष शाह याच्याशी लढत द्यावी लागेल. सतीशने इमान रमाझान याचा ५-० असा धुव्वा उडवला. त्याला मोहम्मद मिलास याच्याशी झुंज द्यावी लागेल. दीपकने मलेक अम्मारी याचा ५-० असा पाडाव केला. त्याची अंतिम फेरीत गाठ जाफर नसेरी याच्याशी पडेल. प्रसादने फिलिपिन्सच्या मार्विन टोबामो याचे आव्हान ५-० असे परतवून लावले. अंतिम फेरीत त्याला ओमिद साफा अहमदी याच्याशी दोन हात करावे लागतील. संजीतने पौर्या अमिरी याला ५-० असे पराभूत केले. त्याची सुवर्णपदकासाठीची लढत एहसान बहानी रौझ याच्याशी होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makaran cup boxing tournament
First published on: 27-02-2019 at 01:38 IST