कुस्ती म्हणजे माझ्यासाठी देवाची प्रार्थना म्हणण्यासारखेच असून पुढच्या ऑलिम्पिकमध्ये पुन्हा पदक मिळवीन, असा आत्मविश्वास ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने व्यक्त केला.

साक्षीने गतवर्षी रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले व ऑलिम्पिक पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू होण्याचा मान पटकाविला. ती म्हणाली, ‘लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारी पहिली महिला कुस्तीपटू होण्याचे माझे स्वप्न आहे. मला समाजात जे काही स्थान मिळाले आहे, ते केवळ कुस्तीमुळेच. कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही. त्याकरिता खूप मेहनत घ्यावी लागते हे खेळामुळे कळू शकले.’

पॅरिस येथे ऑगस्टमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होणार असून, त्यामध्ये अव्वल कामगिरी करण्यासाठी मी सराव करीत आहे, असे सांगून साक्षी म्हणाली, ‘नुकताच माझा विवाह झाला असला तरी माझे पती सत्यवर्त काडियन हे स्वत: आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असल्यामुळे मला खेळासाठी प्रोत्साहनच मिळत आहे. अनेक

परदेशी महिला खेळाडू विवाहित असून काही खेळाडूंना दोन-तीन अपत्येही आहेत. या खेळाडू अजूनही ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करीत आहेत.’