एक तपापेक्षा अधिक काळानंतर महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेवर नाशिक जिल्ह्यास प्रतिनिधीत्व मिळाले असून जिल्हा संघटनेचे सचिव मंदार देशमुख यांची २०१४-१८ या कालावधीसाठी कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून रविवारी पुणे येथे होणाऱ्या संघटनेच्या बैठकीत औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली असून अध्यक्षपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच कायम राहणार आहे.
खो-खो मध्ये सातत्याने वैविध्यपूर्ण उपक्रम आखत राज्यस्तरावर ठसा उमटविणाऱ्या मंदार देशमुख यांना संघटनेत कार्याध्यक्षपदासारखी महत्वपूर्ण जबाबदारी मिळाली आहे. १९९० पासून जिल्हा संघटनेचे सचिव म्हणून कार्यरत असलेले देशमुख हेच यापूर्वी १९९४-९८ या कालावधीत राज्य संघटनेवर सहसचिव होते. स्वत: खेळाडू असलेल्या देशमुख यांचे वडील अरूण देशमुख यांसह साधना व रोहिणी या दोन भगिनींनीही उत्कृष्ट खो-खो खेळाडू म्हणून एक काळ गाजविला आहे. त्यामुळे खेळाडूंना येणाऱ्या अडचणींची त्यांना जाणीव असल्याने नाशिक येथे आयोजित केलेल्या राज्य, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये खेळाडूंच्या हिताचे त्यांनी अनेक उपक्रम राबवून राज्यामध्ये आदर्श ठेवला आहे. त्यात महिला खेळाडूंची हॉटेलमध्ये निवास व्यवस्था, पुरूष संघांसाठी गाद्या व गरम पाण्याच्या सोयीसह निवास व्यवस्था, राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या सर्व खेळाडूंसह प्रशिक्षक व व्यवस्थापक यांना रोख बक्षिसे, विजेत्या संघास रोख बक्षिसे, भोजनाची उत्कृ ष्ट व्यवस्था राज्याच्या संघास प्रायोजकत्व मिळविणे इत्यादीचा प्रामुख्याने समावेश करता येईळ. त्यंच्या उपक्रमामुळे राज्यातील नव्हे तर देशातील खेळाडूही स्पर्धा नेहमीच नाशिकला भरविण्याचा आग्रह करीत. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जिल्हा संघटनेने स्पर्धाच्या आयोजनादरम्यान खेळाडुंच्या हिताला अधिक प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अनेक उपक्रम राबविले आणि नंतर त्यांची अंमलबजावणी राज्यात इतरत्र झाली. जिल्ह्य़ाने १९८६ मध्ये कुमार गट आमंत्रितांची स्पर्धा, १९८९-९० मध्ये राज्य अजिंक्यपद स्पर्धा, राज्य संघाचे प्रशिक्षण शिबीर, १९९६ मध्ये राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, २०१० मध्ये किशोर व किशोरी गटाची राज्य स्पर्धा, २०११-१२ मध्ये राज्य स्पर्धा यांचे यशस्वीपणे आयोजन केले आहे.
देशात प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी महिला खेळाडूंची हॉटेलमध्ये निवास व्यवस्था, देशात खो-खोच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षक व व्यवस्थापक यांना रोख रकमेची बक्षिसे, सवरेत्कृष्ट खेळाडूस रोख पाच हजार रूपयांसह वॉशिंग मशिन, किशोर गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या तीन आणि साखळीतील विजेत्या संघांनाही रोख रकमेची बक्षिसे, नाशिक येथे आयोजित राज्य स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचा एक लाखाचा अपघाती विमा, सर्व खेळाडूंना टी-शर्ट, टोपी, ओळखपत्र यासह टूथब्रश, पेस्ट, साबण, तेल, पावडर, कंगवा, शॅम्पू या सर्वाचा समावेश असलेले ‘मॉर्निग किट’ चे वाटप, अशा प्रकारे खेळाडूंची काळजी घेण्यात आली. याशिवाय निवासाचे ठिकाण ते क्रीडांगण यादरम्यान खेळाडूंसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था, विद्युतझोतात  स्पर्धा, स्पर्धेदरम्यान छायाचित्रकारांसाठी स्पर्धा, राज्य संघटनेकडून प्राप्त निधीपैकी खर्च वजा जाता शिल्लक राहिलेली रक्कम राज्य संघटनेस परत करणारी एकमेव जिल्हा संघटना, स्थानिक खेळाडूंना शिष्यवृत्ती देणारी राज्यातील एकमेव संघटना, १९९६ च्या राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान राज्यात प्रथमच इलेक्ट्रॉनिक गुणफलकाचा अवलंब करणारी संघटना, अशी वैशिष्टय़े देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने जपली आहेत. राज्यात कुठेच न होणारे असे उपक्रम राबवूनही १५ वर्षांपासून राज्य संघटनेवर जिल्ह्य़ाला प्रतिनिधीत्व नव्हते. त्यामुळे जिल्हा पदाधिकाऱ्यांमध्ये काहीशी निराशेची भावना दाटून आली असतानाच देशमुख यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्ह्यातील खो-खो प्रेमींना एक सुखद धक्का बसला आहे.