आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही असंख्य अडचणींचा सामना करत आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून क्रिकेटपटू जहागीर अन्सारीने मुंबईच्या १४ वर्षांखालील संघात स्थान मिळवले. ‘क्रिकेटची जहागीर हासील करण्यासाठी गरिबीला जिद्दीची झालर!’ या लोकसत्तात १३ जानेवारी रोजी छापून आलेल्या बातमीनंतर जगातील अव्वल वेगवान गोलंदाज बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या जहागीरवर विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
शिक्षण, क्रिकेटसाठीची महागडी साधनसामुग्री आणि अद्ययावत प्रशिक्षण या सर्वाचा मेळ साधताना होणारी जहागीरची तारेवरची कसरत आता लवकरच संपणार आहे. मुंबईतील एका नामांकित कंपनीने जहागीरच्या शालेय शिक्षणासहित क्रिकेट प्रशिक्षण आणि किट्सचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ वकील अ‍ॅड. शरद चिटणीस यांनीही मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच साबूसिद्दीक तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे विभागप्रमुख मनोज देशमुख यांनी जहागीरसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. नवी मुंबईतील खासदार संजीव नाईक यांनी जहागीरला भविष्यात कारकीर्द घडवताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, असे आश्वासन दिले आहे. त्याला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी संजीव नाईक यांनी दाखवली आहे.