सध्याच्या जगात तंदुरुस्तीचं वेड फारच. प्रत्येक विभागात वातानुकूलित, सर्व सोयींनी युक्त अशा ‘जिम’ पाहायला मिळतात. काही दिवस आपण गेलो की आपले ‘डोले-शोल्ले’ होतात, असं तरुण पिढीला वाटतं. पण व्यायाम कशाशी ‘खातात’ हे मात्र त्यांच्या गावी नसतं. कुणी सांगतं अमुक करा, म्हणून डोळे बंद करून ते व्यायाम आणि आहार करतात आणि आपण ‘मि. युनिव्हर्स’ होऊ शकतो, या मृगजळात ते स्वत:च्या शरीरावर अत्याचार करतात. व्यायामाचा पाया त्यांच्या गावीही नसतो. पण त्याउलट कुर्ला येथील सान्निध्य ही व्यायामशाळा. १९९१ साली फक्त दोन डम्बेल्सवर सुरू झालेली. पण या व्यायामशाळेने आतापर्यंत जवळपास ४० दर्जेदार शरीरसौष्ठवपटू घडवले. एकदा ‘सान्निध्या’त आलं की दर्जेदार शरीरसौष्ठवपटू घडतात, हा विश्वास साऱ्यांचाच. ज्याला अजूनही तडा गेलेला नाही आणि व्यायामाचा पाया रचणाऱ्या या व्यायामशाळेकडून असे होणेही नाही. त्याला कारण आहेत ते मधुकर थोरात सर.
१९९१ साली व्यायामशाळेच्या उद्घाटनाच्या वेळी आपल्या शरीरसौष्ठवाचे सादरीकरण करत त्यांनी व्यायामशाळेसाठी पैसे जमवले. सुरुवातीला फक्त १० बाय १०ची खोली व्यायामशाळेसाठी होती. व्यायामासाठी उपकरणं काहीच नव्हती. अण्णा कदम आणि भाई कदम यांच्या शिस्तीत थोरात सर घडले. नमस्कार, बैठका यांचाच ‘खुराक जोरदार’ करत त्यांनी शरीरसंपदा कमावली. एक खेळाडू म्हणून त्यांनी एक काळ गाजवला. ‘भारत श्री’पासून ते शिवछत्रपती पुरस्कारापर्यंत त्यांनी मजल मारली. त्यानंतर भारताचे प्रशिक्षक असलेले प्रवीण सकपाळ यांना त्यांनी घडवले. सध्या व्यायामशाळेचे प्रशिक्षक असलेले सुधीर तिवरेकरही त्यांचेच शिष्य. तीन छत्रपती पुरस्कार विजेते याच व्यायामशाळेचे. सुहास खामकर, किरण पाटील, वीरेश धोत्रे, किरण किणी, योगेश निकम, स्वप्निल कदम, शॉन फर्नाडीस, अजय पेवेकर, राहुल साळुंखे, राजेश वडाम, संतोष दुपे, राजेश एरुणकर, राकेश म्हात्रे, अजय चौकेकर, उत्तम सालियन, संतोष पाटील, दीपक साळवेकर आणि बरेच नावाजलेले शरीरसौष्ठवपटू ‘सान्निध्य’त घडले.
व्यायामशाळेत सुरुवातीला फक्त २-३ डम्बेल्स होते. त्यानंतर ‘स्कॉट’ मारण्यासाठी थोरात सरांनी कुल्र्याचा भंगार बाजार गाठला, तिथून पाण्याचे पाइप घेऊन आले, ते वाकवले आणि ‘स्कॉट’साठी यंत्र बनवलं. या बाजारातून त्यांनी ‘स्क्रू’ आणले, त्याचं स्टॉपर केलं, ‘स्कॉट’च्या यंत्राला स्टँड केला. पैसे गाठीशी नव्हतेच. त्यामुळे असे ‘उद्योग’ करत त्यांनी व्यायामशाळा उभारली आणि खेळाडू घडवले. एकेकाळी ‘भारत श्री’ स्पर्धेसाठीचे जवळपास ९-१० शरीरसौष्ठवपटू याच व्यायामशाळेतले पाहायला मिळायचे. व्यायाम करयाला साहित्य अपुरं होतं, पण कुणीही कधीही कुरबुर केली नाही. एक शरीरसौष्ठवपटू व्यायाम करत असेल तर त्याला बाकीचे मदत करायचे. त्याचा व्यायाम झाला की त्याचे साहित्य आपल्या व्यायामासाठी वापरायचे. त्यांच्यामध्ये स्पर्धा होती, पण ती निकोप अशीच. दुसऱ्याची रेष लहान करून आपल्या कारकीर्दीची रेष मोठी करण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही. हे सारे या व्यायामपटूंमध्ये बिंबवलं ते नेहमीच प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणाऱ्या थोरात सरांनी. एवढे शरीरसौष्ठवपटू घडवूनही त्याचे श्रेय थोरात सरांनी कधीही घेतले नाही. मी फक्त निमित्त मात्र, असंच ते म्हणत आले. या व्यायामशाळेत त्यांनी कधीही कुणाकडून सक्तीने शुल्क आकारले नाही. पण व्यायाम मात्र मन लावून करा, एवढंच त्यांचं म्हणणं असायचं.
सध्याच्या घडीला आधुनिक उपकरणांच्या वापराने झटपट शरीरसंपदा होते, अशी बऱ्याच जणांची भावना आहे. पण ‘सान्निध्य’ या गोष्टींना छेद देते. पैशापेक्षा मेहनत, समर्पण, प्रामाणिकपणा महत्त्वाचा. उपकरणांच्या व्यायामापेक्षा नमस्कार आणि बैठका महत्त्वाच्या. ज्यांचा पाया मजबूत ते कधीही डगमगणार नाहीत, हेच सान्निध्य आणि थोरात सरांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या याच पायावर शरीरसौष्ठवपटूंची ‘फॅक्टरी’ उभी आहे.
मला छत्रपती पुरस्कार मिळाला, रेल्वेत नोकरी मिळाली, भारतीय संघाचा प्रशिक्षक झालो, आज मी जे काही आहे ते सान्निध्य व्यायामशाळा आणि थोरात सर यांच्यामुळेच. या दोन गोष्टी माझ्या आयुष्यात अतिशय महत्त्वाच्या आहेत. या व्यायामशाळेने आमच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवली नाही, पैशांचीही नाही. थोरात यांच्या संस्कारांनी आम्हाला घडवलं. खेळाडू म्हणून खेळत असताना व्यायामशाळेने मदतीचा हात दिला. आता भारताचा प्रशिक्षक झाल्यावर मी बऱ्याच व्यायामशाळांमध्ये प्रशिक्षणासाठी जातो. पण व्यायाम मात्र सान्निध्यमध्येच करतो. थोरात सर आम्हाला व्यायामाचा कार्यक्रम ठरवून द्यायचे. पण आम्ही कोणता व्यायाम केला नाही, हे त्यांना आमची कसरत न पाहता समजायचे. – प्रवीण सकपाळ, भारताचे प्रशिक्षक
अण्णा आणि भाई हे माझे गुरू. त्यांनी जे मला शिकवलं, तेच मी बाकीच्यांना शिकवत आलो. मी फक्त या शरीरसौष्ठवपटूंना माझा वेळ दिला, ज्ञान गुरूंचंच होतं. बरेच जण म्हणतात की मी त्यांना घडवलं. त्यांना घडवणारा मी कोण? ही सारी गुरूंची ताकद. या व्यायामशाळेत जास्त उपकरणं नव्हती, त्याचा फरक मला कधीच जाणवला नाही. कारण नमस्कार आणि बैठका यावर आमचा जोर असायचा. त्यामुळे व्यायामशाळेत उपकरणांसाठी मी कधीच आग्रह धरला नाही. मेहनत महत्त्वाची. त्यावर तुमची शरीरसंपदा अवलंबून असते. ‘सान्निध्य’ हे माझ्यासाठी कुटुंब आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीमुळेच हे सारे करता आले. सान्निध्यने मला बरंच काही दिलं आणि तेच परत करण्याचा मी प्रयत्न करतो, एवढेच. –मधुकर थोरात, व्यायामशाळेचे संस्थापक, प्रशिक्षक