मैदानी खेळांमधील एक पुरातन खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंगडीने गेल्या काही वर्षांत वेगाने भरारी घेतली असली तरी त्याच्या प्रमुख नियमांविषयी चर्चा नेहमीच ऐरणीवर असते. खेळाडूच्या अधिक सक्षम पायाने लंगडी घालण्याची पारंपरिक पद्धतच योग्य की नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी व स्पर्धेतील रंगत वाढवण्यासाठी सुरू झालेला उजव्या-डाव्या पायाचा खेळ सरस, या लंगडीतील नियमांवरून विशेषज्ञांमध्ये मतभेद आहेत.

कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, क्रिकेट यांसारख्या अनेक खेळांच्या तयारीला उपयुक्त असणारी लंगडी सध्या महाराष्ट्रातील २२ राज्यांत व एकूण १२ देशांत खेळली जाते. नव्या नियमांनुसार लंगडीचा खेळ ३६ मिनिटे रंगतो. २००९पासून लंगडीत लागू झालेल्या नियमावलीनुसार प्रत्येकी ९ मिनिटांमध्ये विभागल्या गेलेल्या चार सत्रांपैकी पहिल्या व दुसऱ्या सत्रात संघ अनुक्रमे उजव्या व डाव्या पायाने लंगडी घालतो. याप्रमाणेच, उर्वरित दोन सत्रांत विरोधी संघ याचे अनुकरण करतो. पूर्वी फक्त एकाच पायाने लंगडी खेळली जायची. याचप्रमाणे लंगडी घालणाऱ्या संघातील खेळाडूला आधीच्या नियमानुसार उजव्या किंवा डाव्या कोपऱ्यातूनच लंगडी घालता यायची. परंतु या नियमातही बदल होऊन चौकटीच्या मध्यातून चढाईची सुरुवात करतो.

लंगडी सध्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपासून अतिशय दूर असली तरी खेळाडूला यामध्ये नक्कीच व्याप्ती आहे. शालेय जीवनापासून पाहिले तर लंगडी हा सर्वात आवडीने व ताकदीने खेळला जाणारा खेळ आहे. कबड्डी, खो-खोमधील खेळाडू लंगडीचा उपयोग करून आपली तग धरण्याची क्षमता वाढवतात. विशेष म्हणजे खेळाडूंना अधिक खेळता यावे यासाठी आम्ही सामन्यांची वेळ वाढवून नऊ मिनिटे केली आहे. याबरोबरच पूर्वी फक्त एका पायाने खेळल्या जाणाऱ्या नियमात बदल आणून आम्ही दोन्ही पायांचा वापर करणे २००९पासून अनिवार्य केले आहे. त्यामुळे खेळातील रंगत टिकून राहते व त्याचबरोबर खेळाडूंना आपल्या पूर्ण अवयवांचा वापर करता आला पाहिजे, हा त्यामागील हेतू आहे. सरावाच्या जोरावर हे शक्य आहे आणि यामुळे खेळाडूला दुखापत होत नाही. आक्रमण किंवा बचाव करणाऱ्या संघाचे यामुळे गुण कमी होतात. लंगडीला चांगले दिवस आणण्यासाठी हे बदल आवश्यक होते. लंगडी ही मैदानी खेळांची जननी मानली जाते. एकूणच क्रीडारसिकांचा लंगडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी हे बदल महत्त्वाचे आहेत. सुरेश गांधी, भारतीय लंगडी महासंघाचे सचिव

लंगडी हा एक पारंपरिक रीतीने चालत आलेला खेळ असून यातील नवे नियम मला तरी अनाकलनीय आहेत. कमी खर्चीक किंबहुना काहीही खर्च नसलेल्या या खेळासाठी फक्त १० बाय १०ची चौकट आवश्यक आहे. लंगडी खेळताना शरीराची दमछाक होणे स्वाभाविक आहे. पण याशिवाय खेळाडूला यशाची चव चाखता येत नाही. अत्यंत लवचीक शरीर असल्यास तुम्हास लंगडी खेळल्यावर फारसा थकवा जाणवत नाही. विशेष म्हणजे आपल्या प्रत्येकाची कोणतीही एकच बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा अधिक सक्षम व बळकट असते. अशा वेळी तुमच्या कमकुवत बाजूचा वापर केल्यास दुखापत होण्याचा धोका संभवतो. शाळेपासून आपण एकाच पायाने लंगडी खेळल्याचे पाहिले असेल. लंगडीव्यतिरिक्त इतर खेळ जसे की लांब उडी, तिहेरी उडी यामध्ये खेळाडू आपल्या मजबूत पायावरच सर्वाधिक जोर देऊन मग उडी मारतो. तिरंदाजीतसुद्धा खेळाडू आपल्या बळकट हाताने नेम साधतो. मग लंगडीमध्ये दोन पायांचा उपयोग का? हे मला न उलगडणारे कोडे आहे. अशाने तुमच्या कमी ताकदीच्या पायावर सहनशक्तीच्या पलीकडे भार येऊन त्यास इजा होऊ शकते व हे चुकीचे आहे. याबरोबरच मध्यातून लंगडी घालण्याचा नियमही अयोग्य आहे. त्यामुळे खेळात काहीही फरक पडणार नाही. किंबहुना लंगडी घालणारा खेळाडू संभ्रमात सापडेल व त्याचा पाय जमिनीला टेकून तो बाद होईल.  गो. वि. पारगावकर, मुंबई शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य

लंगडीतील नवे नियम हे योग्यच असून त्यामुळे अष्टपैलू खेळाडू घडण्यास मदत होईल. आधुनिक काळात युवा खेळाडूला दुखापत होण्याची संधी अधिक असते म्हणून दोन्ही पायाने लंगडी घातल्यास त्याच्या एका पायावर अतिरिक्त भार पडत नाही व त्याला इजादेखील होत नाही. मध्यातून चढाईची सुरुवात करणारा नियमही स्पर्धेतील रंगत टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. चढाई करणाऱ्या खेळाडूला यामुळे विरुद्ध संघातील खेळाडूंना बाद करण्याची अधिक संधी मिळते. बाळ तोरसकर, मुंबई लंगडी असोसिएशनचे सचिव

लंगडीतील दोन्ही पायांचा वापर करण्याचा नियम शारीरिक व खेळाच्या दृष्टीने बरोबर आहे. एकाच पायावर जोर दिल्याने शरीराच्या त्या भागावर ताण पडतो व तेथील स्नायूंची वाढ होते. जसे लिखाण करताना आपल्या मानेवर किंवा खांद्यावर ताण जाणवतो तसेच लंगडीमध्ये आहे. यामध्ये तुमच्या मजबूत पायावर सारखा दबाव वाढल्यामुळे माकडहाड व कंबरेचे स्नायू दुखावतात व वेदना वाढू लागतात. म्हणूनच दोन्ही पायांच्या बळावर खेळणे उत्तम आहे. कारण त्यामुळे खेळाडूंना दुखापती होण्याच्या आशा मावळतात.  डॉ. डायना पिंटो, फिजिओथेरपिस्ट

लंगडीमधील नवे नियम हे अष्टपैलू घडवण्याच्या दृष्टिकोनाने सुरू करण्यात आले असले तरीही, यामुळे खेळाडूंना आपल्या मर्जीनुसार खेळण्यावर ताबा घालावा लागत आहे. जसे गणिताचा पेपर लिहिताना पहिल्या एका तासात उजव्या व नंतर दुसऱ्या तासाला डाव्या हाताने पेपर लिहिणे कठीण आहे. त्याप्रमाणेच लंगडीतही पाय बदलून खेळणे जोखमीचे व आव्हानात्मक आहे. लंगडी खेळ पारंपरिक प्रथेप्रमाणेच सुरू राहिला पाहिजे. जेणेकरून खेळाडूला खेळाचा आनंद लुटता येईल. अरुण देशमुख, भारतीय लंगडी संघटनेचे माजी सचिव