टेनिस क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या विम्बल्डन खुल्या स्पर्धेच्या एकेरीत आठवे विक्रमी विजेतेपद मिळवण्यासाठी रॉजर फेडरर उत्सुक आहे. गतवर्षी त्याला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३६ वर्षीय फेडररला या स्पर्धेतील पुरुष गटात सर्वात ज्येष्ठ विजेता होण्याचीही संधी आहे. त्याला गतवर्षी उपांत्य लढतीत मिलोस राओनिकने पाच सेट्सच्या लढतीनंतर पराभूत केले होते. त्यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो वर्षभर खेळू शकला नव्हता. जानेवारीत त्याने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत अव्वल स्थान मिळवत आपण अद्यापही ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद मिळवू शकतो, हे दाखवून दिले होते. विम्बल्डनमध्ये पीट सॅम्प्रसने सात वेळा विजेतेपद मिळवले होते. फेडररने या विक्रमाची बरोबरी केली आहे. मात्र फेडररने आतापर्यंतच्या कारकीर्दीत १८ ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपदे मिळवली आहेत.

फेडररच्या विक्रमी विजेतेपदाच्या मार्गात प्रामुख्याने अ‍ॅण्डी मरे, नोव्हाक जोकोव्हिच व राफेल नदाल यांचा अडथळा राहणार आहे. त्याने नुकत्याच झालेल्या हॅले स्पर्धेत नवव्यांदा विजेतेपद मिळवत ग्रास कोर्टवरील हुकमत सिद्ध केली आहे. त्याने यंदा केवळ दोनच सामने गमावले आहेत.

नदालने १० वेळा फ्रेंच स्पर्धा जिंकली असली, तरी त्याला विम्बल्डनमध्ये वर्चस्व गाजवता आलेले नाही. त्याने २००८ व २०१०मध्ये विजेतेपद मिळवले होते. त्याला २००६, २००७ व २०११मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. २०१२ ते २०१५मध्ये त्याला निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले होते. स्पध्रेविषयी नदाल म्हणाला, ‘‘विम्बल्डनच्या ग्रास कोर्टवर खेळताना गुडघ्यांची तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. फ्रेंच स्पर्धेत विजेतेपद मिळवले असले तरीही ग्रास कोर्टवर खेळताना खूपच जलद हालचाली कराव्या लागतात. त्यासाठी आवश्यक असणारी शंभर टक्के तंदुरुस्ती मी कितपत देऊ शकेन, याबाबत साशंक आहे.’’

मरेने गतवर्षी या स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. तो जरी विजेतेपदाचा दावेदार असला, तरी नुकत्याच झालेल्या क्वीन्स चषक स्पर्धेतील पहिल्याच फेरीत त्याला धक्कदायक पराभव स्वीकारावा लागला होता. जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू मरेने २०१३ मध्येही विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती.

जोकोव्हिचने तीन वेळा विम्बल्डन स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले आहे. त्याला फ्रेंच स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत डॉमिनिक थिएमने सरळ तीन सेट्समध्ये हरवले होते.

स्टुटगार्ट स्पर्धेतील पराभवापासून मी खूप शिकलो आहे. हॅले येथील विजेतेपदामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. विम्बल्डन विजेतेपद मिळवणे ही काही सोपी गोष्ट नाही. परंतु या स्पध्रेत विक्रमी कामगिरी करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे    रॉजर फेडरर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi articles on roger federer
First published on: 29-06-2017 at 03:19 IST