ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या रॉड लेव्हर एरिनावर नाबाद शतक साजरे करीत रॉजर फेडररने शानदार आगेकूच केली, तर महिलांमध्ये मारिया शारापोव्हाने गतविजेत्या कॅरोलिना वोझ्नियाकीवर मात करीत चौथ्या फेरीत प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन सेटपर्यंत रंगलेल्या या महिलांच्या लढतीत शारापोव्हाने वोझ्नियाकीवर ६-४, ४-६, ६-३ अशी मात केली. उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्यानंतर वर्षभराच्या बंदीमधून परतलेल्या शारापोव्हाचा हा पुनरागमनानंतरचा सर्वात मोठा विजय आहे. शारापोव्हाने या विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून तिला आता ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश बार्टीशी झुंज द्यावी लागणार आहे.

शारापोव्हाने यापूर्वी २००८ साली ऑस्ट्रेलियनचे विजेतेपद पटकावले असून त्यानंतर तीन वेळा अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. या सामन्याच्या प्रारंभीच्या सेटमध्ये शारापोव्हा १-४ अशी पिछाडीवर पडली होती. मात्र ती पिछाडी भरून काढताना सलग पाच गेममध्ये विजय मिळवत शारापोव्हाने पहिला सेट जिंकला. दुसऱ्या गेममध्ये वोझ्नियाकीने गतविजेत्याला साजेसा खेळ करीत सामन्यात बरोबरी साधली. मात्र तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा वर्चस्व मिळवत शारापोव्हाने वोझ्नियाकीला पराभवाचा धक्का दिला. शारापोव्हाने यापूर्वी ग्रँडस्लॅम २०१४ साली फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर तिला एकही ग्रँडस्लॅम जिंकता आलेली नाही.

पुरुषांच्या गटात फेडररने अवघ्या २१ वर्षांचा युवा अमेरिकन टेनिसपटू टेलर फ्रिट्झवर ६-२, ७-५, ६-२ असा विजय मिळवला. पहिला सेट फेडररने अवघ्या २० मिनिटांत जिंकून घेत विजयाच्या दिशेने वाटचालीस प्रारंभ केला. पुढील दोन्ही सेटदेखील जिंकून घेत कारकीर्दीतील या मैदानावरील १०० वा विजय नोंदवला.

तब्बल २० ग्रँडस्लॅम विजेतेपदांना गवसणी घातलेल्या फेडररने या विजयासह त्याच्या सातव्या ऑस्ट्रेलियन विजेतेपदाकडे कूच केली आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत फेडररला १४व्या मानांकित ग्रीक टेनिसपटू स्टेफॅनोस सित्सिपासशी झुंज द्यावी लागणार आहे. तसेच विजेतेपदाचा अजून एक दावेदार राफेल नदालने युवा अ‍ॅलेक्स डी मिनॉर याला ६-१, ६-२, ६-४ असे सहजपणे पराभूत करीत तिसरी फेरी गाठली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maria sharapova australian open
First published on: 19-01-2019 at 01:48 IST