Padma Awards : ‘सुपरमॉम’चा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान, पी.व्ही.सिंधूला पद्मभूषण

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पद्म पूरस्कारांची घोषणा केली.

सहावेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या मेरी कोमचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पद्म पूरस्कारांची घोषणा केली. यात राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य आदी क्षेत्रात काम करणाऱ्या देशविदेशातील १४१ मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. मेरी कोमव्यतिरीक्त भारताची आघाडीची महिला बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधूचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

२०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत मेरी कोमने कांस्यपदकाची कमाई केली होती. सिंधूनेही २०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती. याव्यतिरीक्त जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी सिंधू एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने आतापर्यंत १ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्यपदकं मिळवली आहे.

मेरी कोमव्यतिरीक्त क्रिकेटपटू झहीर खान, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, माजी हॉकीपटू एम.पी.गणेश, नेमबाजपटू जितू राय, भारताच्या महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार ओनिअम बेंबम देवी, तिरंदाज तरुणदीप राय यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mary kom awarded padma vibhushan pv sindhu conferred padma bhushan psd

ताज्या बातम्या